Maharashtra Weather : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार

कोकण, घाटमाथ्यावरही धुमाकूळ; पिकांचेही मोठे नुकसान
rain
rainsakal

पुणे : मॉन्सूनच्या पावसाने कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा येथे सर्वाधिक ३३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरात वाहून गेल्याने, तसेच इतर अपघाताच्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात काही मार्गावरील वाहतूक ही प्रभावित झाली आहे. वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या नद्यांच्या पातळीत वाढ झाल्याने काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वरूड जहागीर येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी दांपत्यांचा मृत्यू झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी काहीसा ओसरला आहे. मात्र अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. परंतु नद्यांच्या पाणीपातळीत घट झाल्यामुळे पुराचा धोका टळला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने मंगळवारीही (ता. ९) धुमाकूळ घातला. किनारी भागात वादळी वारे वाहत होते. वाशिष्ठी, जगबुडी, बावनदी, काजळी, अर्जुना नदीची पाणीपातळी कमी झाली होती.

खानदेशात रविवारी (ता. ७) रात्री व सोमवारी दिवसभर आणि रात्रीदेखील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हलक्या, मुरमाड जमिनीत पिकांना पावसाने जीवदान मिळाले. तर काळ्या कसदार जमिनीत सखल भागात पिकांत पाणी साचले. काही भागांत नाल्याकाठी शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडून गेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात सटाणा व मालेगाव तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. सटाणा तालुक्यातील मोसम खोऱ्यात पावसाने तुफान फटकेबाजी केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढ्या-नाल्यांना पूर पाणी आल्याने शेतजमिनींसह पिकांचे मोठे नुकसान झाले. खरिपाच्या पिकांसह डाळिंब, पूर्वहंगामी द्राक्ष बागांना फटाका बसणार आहे. पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. वीर, भामा आसखेड दोन धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यात पावसाचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

कोल्हापुरात ७१ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंगळवारी (ता.९) दुपारपर्यंत सुरूच राहिला. जोरदार पावसाने जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी पात्रांबाहेर पडले आहे. विविध नद्यांवरील एकूण ७१ बंधारे दुपारी दोन वाजेपर्यंत पाण्याखाली गेले. पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे येत्या दोन दिवसांत बहुतांशी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

दिवसभरात

  • - विदर्भात पावसाची संततधार कायम

  • - पूरजन्य परिस्थितीमुळे सहा जणांचा मृत्यू

  • - हिंगोली, परभणी जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस

  • - बीड, लातूर, उस्मानाबादमध्ये जोर कमी

  • - सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर ओसरला

  • - रत्नागिरीत मुसळधार सुरूच

  • - खानदेशात जोरदार सरी, नदीकाठी जमिनी खरवडल्या.

  • - नाशिकच्या मोसम खोऱ्यात जोरदार पाऊस.

  • - कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर

  • - पुण्यात हलका ते मध्यम पाऊस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com