Shivsena
Shivsena

Vidhansabha 2019 : हव्या असलेल्या जागा भाजपने सांगाव्यात; शिवसेनेचा प्रस्ताव

मुंबई - समसमान सत्ता या सूत्राचा आदर करण्याच्या आणाभाका घेत जागावाटप चर्चेला प्रारंभ करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निश्‍चित केला असून, भाजपने त्यांना हवे असलेल्या 14 ते 18 मतदारसंघांची यादी पाठवावी, असे शिवसेनेने सुचवले आहे. भाजपचे आज 123 आमदार आहेत, तर शिवसेनेचे 63.

मित्रपक्षांनी निवडून येण्याची शाश्वती एक-दोन ठिकाणीच असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे शिवसेनेचे मत आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 मतदारसंघांतून लढणार, हे गृहित धरत भाजपला हव्या असलेल्या जागा कळल्या, तर वाटप सोपे होईल, असे शिवसेनेकडून कळवण्यात आले आहे.

एमटीएनएलला लागलेल्या आगीमुळे "मातोश्री'ची दूरध्वनी सेवा बंद असली, तरी फडणवीस व उद्धव यांनी "फेसटाइम'मार्फत गेल्या दोन दिवसांत दोनदा संपर्क साधला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची संख्या धरून त्यांना किती मतदारसंघ हवेत, याबाबत शिवसेनेला माहिती हवी आहे. पुणे, नागपूर या नागरी भागात शिवसेनेची ताकद नाही. भाजपने सर्व जागा जिंकल्या आहेत. त्या मागायच्या नाहीत, असा शिवसेनेचा मनसुबा आहे. नाशिक येथे भाजपवर नाराज असलेले आमदार, तसेच ठाणे शहर या जागा मागण्याचाही शिवसेनेचा मानस आहे. आदित्य यांच्या "यात्रे'बद्दल भाजपने व्यक्त केलेल्या आक्षेपांवरही सविस्तर विचार झाला आहे. शिवसेनेला भाजपची बरोबरी करण्यासाठी तब्बल 60 मतदारसंघांत तयारी करायची असल्याने भाजपचे मत जाणून घेण्यास प्राधान्य आहे. दरम्यान, भाजपने या सूचनेवर विचार सुरू केला आहे. आपल्याला हवे असलेले मतदारसंघ कोणते, यावर काल रात्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी विचार केला. आज शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यातील संवादाची माहिती आज देसाई यांनी रात्री उशिरा उद्धव यांना दिली.

सोईने पक्षांतर 
राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेता कॉंग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांकडून "इनकमिंग'चे प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडे येत आहेत. शिवसेना- भाजपने राजकीय सोय लक्षात घेता ही मंडळी आपापसात सल्ला-मसलतीने वाटून घेण्याची तयारी दाखवली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील, तसेच मराठवाड्यातील लोकसभेची निवडणूक लढलेले उमेदवार पक्षांतर करायला उत्सुक आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपकडे खासदारकीसाठी आलेल्या प्रतिस्पर्ध्याला यश मिळाल्याने त्याचा स्पर्धक उमेदवार शिवसेनेत पाठवून त्याला निवडून आणायची तयारी युतीत सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी ढीगभर नेते युतीत येतील, असे विधान केले. तर, यासंबंधातील सर्व निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचे ठरले आहे. आमच्यासाठी उद्धवजी देतील तो आदेश पाळायचा असेच निश्‍चित असते, असे शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com