पत्रकारितेचे आदर्श 

 विजयकुमार चोप्रा, मुख्य संपादक, पंजाब केसरी वृत्तपत्रसमूह 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

लोकमान्य टिळक यांनी पत्रकारितेच्या विश्वात राष्ट्रीय मूल्ये रुजवण्यासाठी ज्या साहस, संघर्ष आणि बुद्धिमत्तेचे दर्शन घडवले, ते निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी आजही एक दीपस्तंभासारखे आहे. 

बाळ गंगाधर टिळक यांचे नाव स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचे पाळण्यातले नाव बळवंतराव- नंतर त्यांना ‘लोकमान्य’ ही उपाधी मिळाली. त्यांचे लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल यांच्याशी घनिष्ठ संबंध होते आणि ही त्रिमूर्ती ‘लाल, बाल आणि पाल’ या नावाने ओळखली जायची-जिचे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खूप मोठे योगदान होते. लोकमान्य टिळक हे कॉंग्रेसच्या जहाल गटाचे नेते होते आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ ही घोषणा त्यांनी दिली होती. 

लोकमान्य टिळक यांनी पत्रकारितेच्या विश्वात राष्ट्रीय मूल्ये रुजवण्यासाठी ज्या साहस, संघर्ष आणि बुद्धिमत्तेचे दर्शन घडवले, ते निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी आजही एक दीपस्तंभासारखे आहे. लोकमान्य टिळक यांनी पत्रकारितेचा वापर लोकसेवेसाठी केला. याच हेतूने आणि जनतेचा आवाज आणि आकांक्षा यांना बुलंद करण्यासाठी त्यांनी केसरी (मराठी) आणि मराठा (इंग्रजी) या वृत्तपत्रांची स्थापना केली. लोकमान्यांचे लेख स्वातंत्र्यप्रेमींमध्ये एक ऊर्जा तयार करायचे. त्यासाठी त्यांना अनेकदा इंग्रजांनी तुरुंगातही डांबले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

धार्मिक परंपरांना राष्ट्रीय स्तरावर पोचवण्यासाठी खास प्रयत्न करण्याच्या दृष्टीने बाळ गंगाधर टिळक यांना खऱ्या अर्थाने ‘लोकमान्य’ म्हणता येईल. पारतंत्र्याच्या काळात भारतीयांना एका सूत्रात गुंफण्यासाठी आणि त्यांच्यात राष्ट्रीय चेतना निर्माण करण्यासाठी त्यांनी घरगुती गणेशोत्सवाला चळवळीचा आयाम दिला. याच गणेशोत्सवांनी पुढे इंग्रजांच्या विरुद्ध एक सशक्त चळवळीचे रूप घेतले. त्याच्या आधी लोक घरगुती स्तरावरच गणेशोत्सव साजरे करायचे. 

‘पंजाब केसरी’ समूहाचे संस्थापक लाला जगत नारायण हे ‘पंजाब केसरी’ लाला लजपतराय यांचे भक्त होते. तुरुंगात असताना त्यांना लाला लजपतराय यांचे सान्निध्य लाभले आणि लाला लजपतराय त्यांना आपल्या लेखांचे डिक्टेशनसुद्धा द्यायचे. लाला लजपतराय यांच्याच प्रभावामुळे लाला जगत नारायण यांनी १३ जून १९६५ रोजी सुरू केलेल्या दैनिकाचे नाव ‘पंजाब केसरी’ ठेवले. ज्या प्रकारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून देशवासीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत जागवली, त्याच प्रकारे लोकमान्य टिळक आणि लाला लजपतराय यांच्या आदर्शातून ‘पंजाब केसरी’ही आज सत्य आणि न्यायाच्या बाजूने सर्वसामान्यांचा आवाज बनून अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijaykumar chopra writes article about Lokmanya Tilak memory centenary

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: