इक्‍बाल कासकरला व्हीआयपी ट्रीटमेंट 

इक्‍बाल कासकरला व्हीआयपी ट्रीटमेंट 

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकर याला ठाणे पोलिसांनी उपचाराच्या नावाखाली व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे कासकर हा रुग्णालयाच्या आवारात आलिशान मोटारीमध्ये बसून अनेकांशी तब्बल सहा तास गुफ्तगू करत होता. याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कैदी पार्टीतील उपनिरीक्षक व चार पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले. 

ठाणे तुरुंगात बंदिस्त असलेला कासकर याला गुरुवारी सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले होते. या दरम्यान त्याला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचे उघडकीस आले आहे. न्यायालय आणि तुरुंग प्रशासनाने कासकरला दातांची तपासणी आणि उपचारासाठी मुभा दिली होती. त्याच्यावरील उपचार अवघ्या 20 मिनिटांत उरकले; मात्र त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत कासकर हा सिव्हिल रुग्णालयाच्या आवारात बिनधास्त वावरत होता. त्याच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी तैनात असलेले पोलिस नागरिकांवरच डाफरत होते. किंबहुना त्यांनी अनेकांना मोबाईलवर चित्रीकरण करण्यापासून रोखल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. कासकर हा रुग्णालयाच्या आवारात काळ्या रंगाच्या काचा असलेल्या मोटारीमध्ये हातात सिगारेट शिलगावून फोनाफोनी करीत होता. तसेच, मित्रांसह अनेकांच्या भेटीगाठी घेताना नागरिकांच्या दृष्टीस पडल्याने ठाण्यात एकच चर्चा रंगली आहे. 

संगनमत केल्याचा पोलिसांवर ठपका 
या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक रोहिदास पवार, पोलिस नाईक पुंडलिक काकडे यांच्यासह विजय हालोर, कुमार पुजारी, सूरज मनवर यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या अहवालात कैदी पार्टीतील पोलिसांनी संगनमत करून न्यायालयाचे आदेश डावलले. तसेच, कासकरच्या वकिलाकडून पैसे घेऊन त्याला मोबाईलवर संभाषण, जेवण तसेच सिगारेट ओढण्यास आणि मित्रांच्या भेटीगाठी घेण्यास सवलत दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

विभागीय चौकशीचे आदेश 
कासकर प्रकरणात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकारणात सिव्हिल रुग्णालय प्रशासन, पोलिस आणि तुरुंग प्रशासनाकडून माहिती घेऊन, तसेच गरज भासल्यास न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेऊन पुढील कारवाई करणार आहोत, असे पोलिस उपायुक्त दीपक देवराज यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

कासकरला दातदुखीवरील उपचारासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे पोलिस मुख्यालयाकडे गुरुवारी सकाळी 11 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास सोपविण्यात आले. तुरुंगात त्याला घरचा डबादेखील दिला जात नाही. पोलिसांनी रुग्णालयातून सायंकाळी सातच्या सुमारास कासकरला पुन्हा तुरुंग प्रशासनाकडे सोपवले. 
- नितीन वायचळ, ठाणे तुरुंग अधीक्षक 
===================

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com