विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढीपूर्वी टोकन पद्धत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी तिरुपती व शिर्डीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड) सुरू केले जाणार असल्याचे मागील कार्तिकी यात्रेच्या वेळी सांगितले गेले होते. आता येत्या आषाढी यात्रेपासून अशी व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी मंगळवारी जाहीर केले.

टोकन देण्यासाठी पंढरपूरमध्ये तीस ठिकाणी काउंटर सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनेतून ही व्यवस्था सुरू केली जाणार असल्याने समितीला त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही, असे सांगण्यात आले. पंढरपूरमध्ये मद्य व मांस विक्रीस बंदी करावी, यासाठी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीकडून शासनास या विषयीचा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी डॉ. भोसले व सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर व आदींनी केली होती. त्याची दखल घेऊन तसा ठराव आज मंदिर समितीच्या बैठकीत करण्यात आला.

Web Title: vittal darshan pandharpur token process