विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा एकावेळी - डॉ. दीपक म्हैसेकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा नियोजनासाठी आज येथील विश्रामगृहावर शासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

या वेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार मधुसूदन बर्गे आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, 'दर वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल आणि रुक्‍मिणी यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वेगवेगळ्या महापूजा केल्या जातात. या वर्षी प्रशासनाने बदल सुचवला आहे. यानुसार विठ्ठल आणि रुक्‍मिणीची एकावेळी महापूजा केली जाणार आहे. स्वतंत्रपणे महापूजेसाठी अधिक वेळ जातो. त्यामुळे प्रशासनाने महापूजेसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी हा बदल सुचवला आहे. यंदाची आषाढी वारी ही "पर्यावरणपूरक वारी' करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्याप्रमाणे सर्व शासकीय विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशी दिवशीची विठ्ठल-रुक्‍मिणीची पाद्यपूजा व महापूजा एकत्र केल्याने श्री विठ्ठल दर्शनासाठी वारकऱ्यांना अर्धा तास जादा उपलब्ध होणार आहे. या वर्षी संत तुकाराम पालखी मार्गावर 600, तर संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गावर 700 स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.''

आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त
आषाढी यात्रेसाठी या वर्षी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. वारीदरम्यान चारशे पोलिस अधिकारी, पाच हजार पोलिस कर्मचारी, 2,500 होमगार्ड, असा जवळपास आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी दिली. ते म्हणाले, की याशिवाय तीर्थक्षेत्र पोलिस संकल्पना राबवण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व गर्दीचे व्यवस्थापन व्हावे, यासाठी शहरातील महत्त्वाच्या चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

30 हजार विद्यार्थी होणार स्वच्छता दूत
आषाढी यात्रेसाठी पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर येथील विद्यापीठांतील एनएनएसचे 30 हजार विद्यार्थी वारीत प्रथमच स्वच्छता दूत म्हणून सहभागी होणार आहेत. यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी व वारकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, वीज वितरण कंपनी, नगरपालिका, जिल्हा परिषद, पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग, एसटी, पुरवठा विभाग आदी विभागांतील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vittal Rukmini Government Mahapooja Deepak Mhaiskar