चवदार तळे खटल्यावरील खंड प्रकाशित होणार

चवदार तळे खटल्यावरील खंड प्रकाशित होणार


मुंबई -  अस्पृश्‍यविरोधी लढा आणि आंबेडकर चळवळीत महत्व असलेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला विरोध करणाऱ्या खटल्याचा तपशीलवार माहिती देणारा खंड राज्य सरकारच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जयंती वर्षाच्या निमित्ताने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केला जाण्याची शक्‍यता आहे.  या खटल्यात डॉ.आंबेडकर यांना आरोपी करण्यात आले होते. मात्र, त्यांनी न्यायालयात स्वत: युक्तीवाद करत हा खटला जिंकला होता, या खटल्यातील सर्व दस्तावेज, कोर्ट रेकॉर्ड व प्रोसिजर वाचकांना उपलब्ध होणार आहे.

20 मार्च 1927 रोजी महाडच्या तळ्यावर ऐतिहासिक सत्याग्रह करुन डॉ. आंबेडकरांनी सार्वजनिक ठिकाणी पाण्यावर सर्वांचा अधिकार असल्याचे दाखवून दिले. हे तळे सार्वजनिक नसून खाजगी मालकीचे असल्याने त्यावर आमचा हक्क आहे, त्यामुळे आंबेडकर व अस्पृश्‍यांनी कायदेभंग केल्याचा दावा करत महाडचे रहिवाशी पांडुरंग धारप, नरहरी वैद्य यांच्यासह 10 जणांनी महाड सेकंड सब जज कोर्टात खटला दाखल करत आव्हान दिले होते. या खटल्यात डॉ. आंबेडकर यांच्यासह सिताराम शिवतरकर, कृष्णा महार, गण्या मालू चांभार, कानू विठ्ठल महार या पाच जणांना आरोपी करण्यात आले होते.  हे चवदार नव्हे तर चौधरी तळे हे असून ती आमची खाजगी संपत्ती मालमत्ता असे फिर्यादींचे म्हणणे होते. हे  तळे बाटवल्याचा व बेकायदेशीरपणे शिरकाव केल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आला होता. महाड नगरपालिकेने ठराव मांडून चवदार तळे हे सार्वजनिक असून त्या पाण्यावर सर्वांचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते.  तरीही हा खटला महाड कोर्ट ते बॉम्बे हायकोर्ट असा 10 वर्षे चालला. 

महाड न्यायालय, अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयापासून उच्च न्यायालयातील रोजनिशी, सुनावणी, उलटतपासणी, न्यायालयातील कागदपत्रे एकत्रित करुन सुमारे 400 ते 500 पानांचा खंड डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने तयार केला आहे. या खंडाच्या एक लाख प्रती छापल्या जाणार आहेत. तसेच, यापुर्वी प्रसिद्ध झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटोबायोग्राफी या खंडात चुका असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची सुधारित आवृत्ती प्रसिध्द होणार आहे.

डॉ. आंबेडकर यांनी त्याकाळी केलेले लिखाण, मांडलेले विविध विषयांवरील विचार नव्या पिढीला कळावेत, यासाठी उपलब्ध असलेल्या प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्य ग्रंथारुपाने संग्रहित करण्यासाठी राज्य सरकारने 1978 साली समिती स्थापन केली होती. या समितीने 1979 साली 11 प्रबंधाचा समावेश असलेला पहिला खंड प्रसिद्ध केला. आतापर्यंत 24 खंड प्रकाशित झाले असून 7 खंडांचे पुर्नमुद्रण करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. अविनाश डोळस यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com