Loksabha Election: बॅलेट पेपरवर मतदान! ८० वर्षांवरील वृद्ध अन्‌ दिव्यांग मतदारांसाठी सोय; घरी बसून करता येईल मतदान, पण घातली एक अट

लोकसभा निवडणुकीसाठी ८० वर्षांवरील ज्येष्ठांसह किमान ४० टक्के दिव्यांग असलेल्या मतदारांना मतदानासाठी केंद्रापर्यंत येता येत नसल्यास त्यांना घरी बसूनच मतदान करता येणार आहे.
EVM vs Ballot Paper
EVM vs Ballot Paperesakal

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी ८० वर्षांवरील ज्येष्ठांसह किमान ४० टक्के दिव्यांग असलेल्या मतदारांना मतदानासाठी केंद्रापर्यंत येता येत नसल्यास त्यांना घरी बसूनच मतदान करता येणार आहे. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी असा प्रयोग झाला होता. आता लोकसभेतही ‘होम वोटिंग’ची सोय असणार आहे, पण तो मतदारांचा ऐच्छिक अधिकार आहे. सोलापूर जिल्ह्यात ८० वर्षांवरील व दिव्यांग मतदारांची संख्या एक लाख ३४ हजारांपर्यंत आहे. ‘बीएलओ’कडे तसा अर्ज दिलेल्यांनाच घरबसल्या मतदान करता येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३५ लाख ७८ हजार ९७२ असून, त्यापैकी एक लाख नऊ हजार १६२ जणांचे वय ८० वर्षांहून अधिक आहे. तर २४ हजार ८६० दिव्यांग मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी कमी मतदान पडलेल्या गावचे प्रश्न जिल्हा प्रशासनाकडून सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील मतदानाची टक्केवारी सरासरी ६७ ते ६८ टक्क्यांपर्यंत आहे. पण, सोलापूर जिल्ह्यात मागील लोकसभा निवडणुकीत ६१ टक्केच मतदान झाले होते. लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनीच सहभागी व्हावे म्हणून ज्येष्ठांसह दिव्यांग मतदारांसाठी ‘होम वोटिंग’ सोय करून देण्यात आली आहे.

निवडणुकीच्या काही दिवस अगोदर ‘बीएलओ’ त्या मतदारांपर्यंत पोचतील आणि त्यांच्याकडून घरी राहून की मतदान केंद्रावर येऊन मतदान करणार, याचा अर्ज भरून घेतील. ज्यांनी ‘घरी बसून’ असा पर्याय निवडला आहे, त्यांची तालुका तथा मतदान केंद्रनिहाय यादी तयार केली जाईल. त्यानंतर मतदानाच्या एक-दोन दिवस अगोदर संबंधित मतदारांकडून बॅलेट पेपरवर त्यांचे मत नोंदवून घेतले जाणार आहे.

मतदारांचा निर्णय यासाठी अंतिम असेल

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ८० वर्षांवरील ज्येष्ठांसह ४० टक्के दिव्यांग असलेल्यांना, घरी बसूनही बॅलेट पेपरद्वारे मतदान करता येईल. पण, मतदारांचा निर्णय यासाठी अंतिम असेल. त्यांना मतदान केंद्रापर्यंत यायला जमत नसल्यास त्यांनी तसा अर्ज देणे अपेक्षित आहे. त्यानुसार आमचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेतील.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

‘होम वोटिंग’ची सोय, पण पोलिस बंदोबस्तात

ज्या ८० वर्षांवरील वृद्ध किंवा दिव्यांग मतदारांनी ‘होम वोटिंग’चा अर्ज केला, त्यांचे मतदान त्यांच्या घरी जाऊन घेतले जाते. त्यावेळी मतदान कक्ष तेथे नेले जाते. तो मतदार मतदान करताना जवळपास कोणालाही थांबू दिले जात नाही, मतदान अधिकारी व नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी, पोलिस त्याठिकाणी असतात. त्या मतदारांनी मतदान नोंदविल्यानंतर मतदान पेटीत ते बॅलेट पेपर जमा केले जातात. मतदानाच्या आदल्या दिवशी किंवा एक-दोन दिवस अगोदर तेथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया पार पडते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com