Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस लोकसभा निवडणुकीला सामोरी जात आहे.
Ramesh Chennithala
Ramesh Chennithalasakal

- विजय चोरमारे

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस लोकसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपापासून अनेक मुद्द्यांवर मतभेद झाले तरी ते एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकले नाहीत, याचे श्रेय चेन्निथला यांना दिले जाते. त्यांनी संपूर्ण परिस्थिती संयमाने हाताळली आणि महाविकास आघाडीतील वातावरण बिघडू दिले नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील तसेच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीसंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे चार टप्पे पार पडल्यानंतर ‘इंडिया’ आघाडीची स्थिती तुम्हाला कशी दिसते?

रमेश चेन्निथला - ‘इंडिया’ आघाडीची स्थिती सगळीकडे उत्तम आहे. चार टप्प्यांनंतर आमचे सरकार बनण्याची शक्यता ठळक होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी अस्वस्थ आहेत. म्हणूनच ते आपल्या सरकारच्या कामाबद्दल काही बोलत नाहीत. लोकांच्या अपेक्षांबद्दल काही बोलत नाहीत. फक्त हिंदू-मुस्लिम आणि पाकिस्तानबद्दल बोलत सुटले आहेत. पंतप्रधानपदाची म्हणून एक पातळी असते, त्याची मर्यादा मोदी पाळत नाहीत. खालच्या पातळीवर येऊन बोलतात. त्याचा देशाला काय फायदा? पंतप्रधान घाबरलेत त्याचमुळे ते मुद्दे सोडून भरकटायला लागले आहेत.

परंतु काँग्रेसचे नेतेच त्यांना संधी उपलब्ध करून देत आहेत...

- काँग्रेसच्या नेत्यांनी कोणती संधी दिली?

वडेट्टीवार काही बोलतात, सॅम पित्रोदा वेगळाच मुद्दा चर्चेत आणतात, मणिशंकर अय्यर काहीबाही बोलत असतात...

- विजय वडेट्टीवार यांनी नवीन काही सांगितलेले नाही. दहा वर्षांपूर्वी एका पुस्तकात जे लिहिले आहे तेच त्यांनी सांगितले. पण ते काँग्रेसचे मत नसल्याचे आम्ही स्पष्ट केले आहे, मी स्वतः त्यासंदर्भात खुलासा केला आहे. सॅम पित्रोदा जे बोलले त्यावरून त्यांना पद सोडावे लागले. त्यांच्या विधानाशीही काँग्रेस म्हणून आम्ही कोणत्याही पातळीवर सहमत नाही. मणिशंकर अय्यर यांचा काँग्रेसशी आता काही संबंध नाही.

त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल, असे वाटते का?

- तसे अजिबात वाटत नाही. ‘इंडिया’ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कारभारामुळे लोक त्रस्त झाले आहेत आणि ते आपला असंतोष मतपेटीतून व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत. महागाईने सगळेच घटक त्रस्त आहेत. त्यातही विशेषकरून शेतकरी, बेरोजगार तरूण आणि समाजातील गरीब वर्ग भाजप आणि ‘एनडीए’च्या विरोधात आहे. त्यांना बदल हवा आहे. त्यामुळे सगळीकडे परिवर्तनाची लाट पाहावयास मिळते. त्यामुळे आम्ही ठामपणे सांगू इच्छितो की, ‘इंडिया’ आघाडीचे सरकार सत्तेवर येईल.

‘इंडिया’ आघाडी सत्तेवर येण्यासाठी कुठून जागा मिळतील?

- केरळ २०, तमिळनाडू ४०, कर्नाटकात गेल्यावेळी आमची फक्त एक जागा होती. यावेळी त्या वीसपर्यंत जातील. तेलंगणात दहापेक्षा अधिक जागा मिळतील. महाराष्ट्रात तर संख्या वाढणारच. दिल्ली, हरियाना, राजस्थान, हिमाचल राज्यांत काँग्रेसची स्थिती चांगली आहे. उत्तर प्रदेशात भाजपला अपेक्षा होत्या, पण तिथेही अटीतटीच्या लढती होताहेत. बिहारमध्येही आघाडीला चांगल्या जागा मिळतील.

तुम्ही महाराष्ट्राचे प्रभारी आहात, महाराष्ट्राबद्दल तुमची काय निरीक्षणे आहेत?

- महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलोय. सगळीकडे चांगले वातावरण आहे. लोकांना बदल हवा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपने त्यांच्यासोबत जे सरकार स्थापन केले आहे, ते ईडी आणि सीबीआय सरकार आहे. लोकांनी निवडून दिलेले सरकार नाही. महाराष्ट्रातील लोक अशा प्रकारच्या राजकारणाच्या पूर्णपणे विरोधात आहेत. कुणालाच हे सरकार पसंत नाही. आघाडीला लोकांची पूर्ण सहानुभूती आहे. त्याचा फायदा होऊन आघाडीला महाराष्ट्रात जास्त जागा मिळतील.

राष्ट्रवादीकडे शरद पवार, शिवसेनेकडे उद्धव ठाकरे आहेत तसा महाराष्ट्रात ओळखला जाणारा नेता काँग्रेसकडे नाही. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसकडील काही जागा काढून घेतल्या. महाराष्ट्र काँग्रेस नेतृत्वहीन आहे, याची जाणीव होते का तुम्हाला?

- महाराष्ट्रात काँग्रेसकडे लढाऊ नेत्यांची फौज आहे. महाविकास आणि ‘इंडिया’ आघाडीच्या हिताचा विचार करून काही जागांवर आम्ही तडजोड केली. आमच्या जागा शिवसेनेला दिल्या.

काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व आव्हान स्वीकारताना का दिसत नाही? ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये लढतात, अखिलेश कन्नौजसारखी कठीण जागा लढवतात. राहुल मात्र वायनाडचा सोपा पर्याय निवडतात, अमेठीऐवजी अधिक सुरक्षित रायबरेलीला जातात...

- काँग्रेसचे नेतृत्व प्रत्येक राज्यात आव्हान स्वीकारते. रायबरेलीतून राहुल गांधी लढत आहेत, हे त्यांनी आव्हानच स्वीकारले आहे. रायबरेली ही फिरोज गांधी यांच्यापासूनची गांधी परिवाराची जागा आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी तो पर्याय निवडला आहे. वायनाड त्यांची आधीची निवडून आलेली जागा आहे. अमेठीत आमचे दुसरे उमेदवार लढताहेत आणि ती जागाही आम्ही जिंकू याचा आम्हाला विश्वास आहे.

प्रियांका निवडणूक का लढवत नाहीत?

- सगळ्यांनीच निवडणूक लढवली तर प्रचार कुणी करायचा? त्यामुळे प्रियांका निवडणुकीत नाहीत.

तुम्ही प्रचाराचा मुद्दा उपस्थित केला. पण ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी, अमित शाह प्रचार करताहेत, मोठ्या संख्येने सभा घेताहेत, तसा झपाटा काँग्रेसच्या प्रचाराचा दिसत नाही..

- नरेंद्र मोदी घाबरलेत, त्यामुळेच त्यांनी तीन दिवसांत महाराष्ट्रात सात सभा घेतल्या. राहुल गांधींनी मुंबई, पुणे, अमरावती, साकोली, भंडारा याठिकाणी सभा घेतल्या. प्रियांका गांधींनी लातूर, नंदुरबारला सभा घेतल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे धुळे, नागपूरला गेले. काँग्रेसचे नेते सगळीकडे जाताहेत. राहुल गांधींनीच सगळीकडे जायला पाहिजे असे नाही. महाविकास आघाडीचे सगळे नेते सभा घेताहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सगळीकडे सभा होताहेत.

छोट्या पक्षांच्या काँग्रेसमधील विलिनीकरणासंदर्भातील मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केला, त्याबाबत काय भूमिका?

- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा एकच आहे. विलिनीकरणासाठी आमची काही हरकत नाही. त्यामुळे निर्णय शरद पवार यांना घ्यावयाचा आहे. ते राष्ट्रीय नेते आहेत, त्यांनी ठरवावे.

काँग्रेस तयार आहे का राष्ट्रवादीचे विलिनीकरण करून घेण्यासाठी?

- आधी शरद पवार यांची तयारी हवी, त्यानंतर आमच्या तयारीचा मुद्दा येईल.

तुमच्या काही अटी-शर्ती असतील का?

- ते आता सांगण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर त्यासंदर्भात विचार करू.

‘इंडिया’आघाडीचे सरकार सत्तेवर येण्याचा विश्वास तुम्हाला वाटतो. अशा परिस्थितीत जगनमोहन रेड्डी, नवीन पटनायक ही मंडळी तुमच्यासोबत येतील का?

- बहुमत मिळाले तर ते आमच्यासोबत येतील.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही मुद्यांवरून भाजपकडून टीका केली जात आहे.

- आमचा जाहीरनामा एकदम मस्त आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यांवर देशभर खूप चर्चा होतेय. स्वतः पंतप्रधान त्यावर बोलताहेत, यावरून त्याचे महत्त्व लक्षात येऊ शकते. सामान्य लोकांकडूनही त्याचे स्वागत होतेय, याउलट भाजपच्या जाहीरनाम्यावर कुणी चकार शब्द काढीत नाही.

एकट्या काँग्रेसला कितीपर्यंत जागा मिळतील? शंभरच्या पुढे जाईल का?

- सगळीकडे खूप चांगले वातावरण आहे, त्यामुळे अधिक जागा मिळतील. तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक जागा काँग्रेसला मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com