थांबा अन्‌ वाट पाहा आघाडी-युतीबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई : आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असतानाच आघाडी किंवा युतीबाबत "थांबा अन्‌ वाट पाहा' अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केली. विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघातील होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रंगशारदा सभागृहात झालेल्या सभेनंतर ठाकरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

पालघरमधील पोटनिवडणूक भाजप जिंकली असली तरी बहुजन विकास आघाडी, कॉंग्रेस व शिवसेनेच्या मतांची एकत्रित बेरीज केल्यास भाजपचा पराभव झाल्याचेच दिसते, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात केले होते. त्यानंतर पवार यांनी शिवसेनेला विरोधी पक्षांच्या महाआघाडीत सहभागी होण्याची अप्रत्यक्ष ऑफर दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. 

याबाबत ठाकरे यांना विचारले असता त्यांनी, "कोण कोणती ऑफर देतोय ते पाहू या. आधी सर्वांच्या ऑफर येऊ द्या. मग निर्णय घेऊ.' अशी भूमिका घेत त्यांनी आघाडी व युतीबाबतचा संभ्रम कायम ठेवला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेचे महत्त्व वाढल्याचे हे संकेत असून शिवसेनाही "आस्ते कदम'च्या मार्गाने सर्वच राजकीय पक्षांची कोंडी करत असल्याचे चित्र आहे. 
दरम्यान, मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असाच सामना रंगणार आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर विजय मिळवण्यासाठी रणनीती कशी आखावी, याबाबत ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व मतदारांना सूचना केल्या. 

कोण कोणती ऑफर देतोय ते पाहू. आधी सर्वांच्या ऑफर येऊ द्या. मग निर्णय घेऊ. 
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख. 
 
Web Title: wait for Uddhav Thackeray's role in the alliance