वानखेडे स्टेडिअमची राज्य शासनाकडे 120 कोटींची थकबाकी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

-  वानखेडे स्टेडिअमच्या भाडे कराराच्या नुतनीकरणाची 120 कोटी रुपयांची रक्कम मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे थकीत असल्याची बाब आली समोर.

मुंबई : वानखेडे स्टेडिअमच्या भाडे कराराच्या नुतनीकरणाची 120 कोटी रुपयांची रक्कम मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे थकीत असल्याची बाब समोर आली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला नोटीस बजावली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे असलेली 120 कोटी रुपयांची थकबाकी सरकार कधी वसूल करणार असा लेखी प्रश्न आज विधानसभेत विचारण्यात आला होता. त्याला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तर दिले. 

महूूसल विभागाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला वानखेडे स्टेडिअमसाठी भाडेपट्ट्याने जागा दिली आहे. या जागेचा भाडेकरार फेब्रुवारी २०१८ रोजी संपुष्टात आला आहे. या भाडेकराराचे नुतनीकरण करावे अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी भाडेकराराचे नुतनीकरण आणि थकीत कराची मिळून १२० कोटी १६ लाख रुपये रक्कम भरण्याची नोटीस मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठवली आहे.

याबाबत मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तरात विधानसभेत दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wankhede Stadium Dues of Rs 120 Crores to Government