शिक्षक व्हायचंय? थांबा...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

कधीकाळी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजला जाणारा शिक्षकी पेशा आता युवकांना नकोसा वाटू लागलाय की काय, असा विचार करण्याची वेळ आली आहे.

नाशिक - कधीकाळी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजला जाणारा शिक्षकी पेशा आता युवकांना नकोसा वाटू लागलाय की काय, असा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यात डी.एड. अभ्यासक्रमाच्या उपलब्ध ५३ हजार जागांसाठी अवघे चौदा हजार अर्ज प्राप्त झाल्याने, आता कुणाला शिक्षक व्हायचंच नाही का, असा प्रश्‍न उपस्थितीत होतोय. दीर्घ कालावधीपासून शिक्षक भरतीच होत नसल्याने या क्षेत्राकडे युवावर्ग पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

डी.एड.ला प्रवेश मिळावा यासाठी एकेकाळी अर्ज मिळणेदेखील दिव्य असे. मात्र गेल्या तीन- चार वर्षांत भावी शिक्षक घडविणाऱ्या अध्यापक विद्यालयांच्या वाट्याला वनवास आल्याचे चित्र आहे. राज्यात डी.एड. विद्यालयांमधील सुमारे ५३ हजार जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी प्राप्त अर्जांची संख्या केवळ चौदा हजार आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या सर्वांनी प्रवेश घेतला तरी, डी.एड. अभ्यासक्रमाच्या राज्यभरातील ४० हजार जागा रिक्त राहतील, अशी स्थिती आहे.

नाशिक जिल्ह्यात अवघे ४६६ प्रवेश
नाशिक विभागातून या वर्षी चार हजार जागांपैकी एक हजारदेखील प्रवेश होतात की नाही याबाबत शंका आहे. जिल्ह्यात ३० विद्यालयांमध्ये १ हजार ४८० जागा उपलब्ध असून, पहिल्या फेरीअखेर अवघे ४६६ प्रवेश निश्‍चित झालेले आहे. यात उर्दू माध्यमाचे १००, मराठी माध्यमाचे ३४१, इंग्रजी माध्यमाचे २५ अशी स्थिती आहे. 

भरती बंदचा फटका
अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर नोकऱ्याच उपलब्ध नसल्याने अन्य कुठल्यातरी पर्यायाची निवड करण्यास युवक प्राध्यान्य देत आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षांत दरवर्षी ८० हजारांच्या आसपास विद्यार्थी डी.एड. पदविका घेऊन बाहेर पडले. पण त्या तुलनेत नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. गेल्या सात-आठ वर्षांत शासनाची भरती नाही. खासगी संस्थांमध्ये वशिला व पैशांअभावी पदवी घेऊनही फायदा नसल्याचे चित्र आहे. शिक्षक भरती बंद असल्याचा या अभ्यासक्रमाला फटका बसला आहे.

अध्यापक विद्यालये अडचणीत
नाशिक जिल्ह्यातील ४५ अध्यापक विद्यालायांपैकी १७ विद्यालयांत विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याने गेल्या दोन वर्षांत बंद पडली. सध्या जिल्ह्यात २८ विद्यालयांपैकी ६ शासकीय, तर २२ खासगी विनाअनुदानित अध्यापक विद्यालये आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेशाला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता, आणखी काही विद्यालये बंद करण्याची वेळ ओढावू शकते, अशी स्थिती आहे.

टीईटी, टीएआयटी करूनही संधी नाहीच
इयत्ता पहिली ते आठवीकरिता शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा (टीएआयटी) आवश्‍यक केली होती. तर नववी ते बारावीसाठी टीएआयटी परीक्षा आवश्‍यक होती. टीईटी परीक्षेचा सहा वेळा निकाल जाहीर झालेला आहे. टीएआयटी परीक्षेचेही काही झालेले नाही. इतके परिश्रम घेऊन उपयोग होत नसल्याने त्यापेक्षा एमपीएससी, आयबीपीएस यांसारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास उमेदवार प्राधान्य देऊ लागले आहेत.

सर्व प्रकारच्या पात्रता मिळवूनही शिक्षक भरती होत नसल्याने माझ्यासारखे अनेक युवक संधीच्या प्रतीक्षेत आहेत. पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स नोंदवूनही प्रक्रिया पुढे सरकत नसल्याने युवक हतबल झालेले आहेत. नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी डी.एड.सारख्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचेही टाळू लागले आहेत.
-ईश्‍वर फणसे, उमेदवार

अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीमुळे डी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशावरही परिणाम झाल्याचे दिसते. बी.एड. अभ्यासक्रमाला मात्र यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांकरिता अर्ज करणाऱ्यांची संख्या चांगली आहे. 
- प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोरसे, ॲड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय

'पवित्र पोर्टलवर प्रक्रिया संथ
शिक्षक भरतीकरिता पवित्र पोर्टलवर १ लाख ७८ हजार उमेदवारांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी ८६ हजार उमेदवारांनी प्रेफरन्स लॉक केलेले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत येणाऱ्या शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये १२ हजार ०१८ जागा उपलब्ध असताना त्यावर भरती केली जात नसल्याने, उमेदवार हतबल झाले आहेत. पोर्टलवरील प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने संतप्त भावना व्यक्‍त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Want to become a teacher? stop