गोदामातील वस्तू लाभार्थ्यांपर्यंत पोचणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई - आदिवासी क्षेत्रात वाटप करण्यासाठी 2012 मध्ये खरेदी करण्यात आलेल्या विविध वस्तू गोदामातल्या कडी-कुलपातून बाहेर पडून आता लाभार्थ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचे वृत्त "सकाळ'ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल आदिवासी विभागाने घेतली असून, राज्यातील आदिवासींसाठी खरेदी करण्यात आलेल्या वस्तू आश्रमशाळा अथवा इतर कुठल्याही गोदामात पडून असतील तर लाभार्थ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांचे वाटप केले जावे. जर लाभार्थी निश्‍चित नसतील तर आदिवासी विद्यार्थ्यांना त्याचे वाटप केले जावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डी आश्रमशाळेच्या गोदामात गेली सहा वर्षे जीवनोपयोगी साहित्य पडून असल्याचे विधिमंडळ अनुसूचित कल्याण समितीच्या पाहणीत आढळून आले होते. याविषयी कॉंग्रेसचे आमदार डॉ. संतोष टारफे यांनी देखील पाठपुरावा केला होता. या गोदामात 80 शिलाई मशिन, 114 सायकल, धान शिवणी यंत्रे, संसारपयोगी स्टीलची भांडी, 22 दुचाकी, कीटकनाशक फवारणी यंत्रे, ब्लॅंकेट, क्रीडा साहित्य पडून आहे. यापैकी बहुतांश साहित्य आता गंजलेल्या अवस्थेत असल्याने निरुपयोगी ठरण्याची शक्‍यता आहे. मात्र डागडुजी करून बऱ्याच वस्तू वापरात येतील, असा विश्‍वास एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला. या वस्तूंचे वाटप करताना हुशार विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आलेत. शिलाई मशिनचे वाटप मुलींना करताना त्याचे शिलाई कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्याचे वाटप केले जावे, अशाही सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले अनेकदा लाभार्थी निश्‍चित नसतानाही योजना आली की खरेदी केली जात असे. त्यामुळे अशा वस्तू गोदामात पडून असल्याच्या तक्रारी येतात. आता मात्र वैयक्तिक लाभाच्या वस्तूंची खरेदी आता होत नाही. लाभार्थ्यांना थेट रोख पैसे दिले जातात. मात्र चंद्रपूरमधील बोर्डीमधील गोदामात पडून असलेल्या वस्तूंप्रमाणे इतर ठिकाणीही वस्तू असण्याची शक्‍यता आहे. या वस्तूंचे ताबडतोब वाटप केले जावे यासाठी आदेश देण्यात आलेत.

Web Title: Warehouse goods will reach the beneficiaries