पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामान 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे - बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान तापमान सरासरीच्या वर गेल्याने राज्याच्या बहुतांशी भागात थंडी कमी झाली आहे. शुक्रवारी (ता. १४) दुपारनंतर सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. पूर्व विदर्भात पावसाची शक्यता हवामान वर्तविण्यात आली आहे. 

पुणे - बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान तापमान सरासरीच्या वर गेल्याने राज्याच्या बहुतांशी भागात थंडी कमी झाली आहे. शुक्रवारी (ता. १४) दुपारनंतर सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. पूर्व विदर्भात पावसाची शक्यता हवामान वर्तविण्यात आली आहे. 

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणाली पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. यामुळे विदर्भात पावसाला पोषक हवामान होत आहे. मंगळवारपर्यंत (ता. १८) पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर शुक्रवारी (ता. १४) दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील भुदरगड, साेलापूर करमाळा, सांगली जिल्ह्यांतील वाळवा तालुक्यांमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. 

राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमानात वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित भागात तापमान १२ अंशांच्या पुढे गेले आहे. जळगाव येथे १०.३ अंश, तर नाशिक येथे १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांची वाढ झाल्याचे दिसून आले. 

शनिवारी (ता. १५) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.० (४), जळगाव १०.३ (-१), कोल्हापूर १८.७ (३), महाबळेश्‍वर १३.० (-१), मालेगाव १३.८ (३), नाशिक १०.६ (०), सांगली १७.९ (३), सातारा १८.४ (५), सोलापूर १९.२ (४), सांताक्रूझ २२.६ (४), अलिबाग २२.४ (४), रत्नागिरी २४.२ (४), डहाणू १८.५ (०), आैरंगाबाद १५.६ (५), परभणी १५.४ (२), नांदेड १६.० (४), अकोला १२.५ (-१), अमरावती १४.२ (-१), बुलडाणा १२.८ (-२), चंद्रपूर १६.६ (३), गोंदिया १२.४ (०), नागपूर १२.३ (-१), वर्धा १४.५ (१), यवतमाळ १४.० (-१). 

पूर्व किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा 
बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) आणखी तीव्र होत असून, आज (ता. १६) त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येत असलेले चक्रीवादळ सोमवारी (ता. १७) पूर्व किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warm weather for the monsoon in the eastern Vidarbha