पानी फाउंडेशनची संपूर्ण टीम वॉटर कप स्पर्धेसाठी सज्ज : आमिर खान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

“दरवर्षीप्रमाणेच पानी फाउंडेशनची संपूर्ण टीम वॉटर कप स्पर्धेसाठी सज्ज आणि उत्सुक आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचं प्रमाण लक्षात घेता आम्हाला पुन्हा एकदा विकेंद्रीत जलसंधारणाच्या कामाचं महत्त्व समजलं. निवडलेल्या ७६ तालुक्यांमधील गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन त्यांच्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, अशी कळकळीची विनंती मी सर्व गावांना करत आहे', असं पानी फाउंडेशनचा संस्थापक आणि अभिनेता आमिर खानने म्हटलं आहे.

पुणे : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील कार्यालयात करण्यात आली. राज्यातील जल संवर्धन, कृषी आणि ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ हे व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत या बैठकीत सामील झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पानी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान, किरण राव, पानी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, नामदेव ननावरे यामध्ये सहभागी झाले होते.

पुढील वर्षी ८ एप्रिल ते २२ मे २०१९ दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या विजेत्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रु., ५० लाख रुपये आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या गावांना देण्यात येणाऱ्या एकूण बक्षिसांची रक्कम रुपये ९.१५ कोटी राहणार आहे.

स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या वतीने ‘पाणलोट विकासा’चे प्रशिक्षण लोकांना देण्यात येते. ४५ दिवसांच्या या कालावधीतील स्पर्धेत 'श्रमदान', पाणलोट उपचारांचे नियोजन आणि निर्मिती यांचा समावेश राहील. ज्यामुळे जमीनीतील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. निवडलेल्या तालुक्यातील प्रत्येक महसूली गाव या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहे.

राज्यातील २४ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये यावर्षी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ३१ जानेवारी २०१९ पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. राज्याच्या जल समृद्धीचा प्रवास अखंड सुरू राहण्यासाठी पानी फाउंडेशनने निवडलेल्या तालुक्यांतील सर्व गावांना आमंत्रण देण्यात आले आहे.

या स्पर्धेला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. आपले प्रत्येक योगदान हे महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीच्या प्रवासात अतिशय मोलाचे योगदान ठरणार आहे. अधिकाधिक गावांनी आणि गावकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

पानी फाउंडेशनची संपूर्ण टीम वॉटर कप स्पर्धेसाठी सज्ज : आमिर खान 
“दरवर्षीप्रमाणेच पानी फाउंडेशनची संपूर्ण टीम वॉटर कप स्पर्धेसाठी सज्ज आणि उत्सुक आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचं प्रमाण लक्षात घेता आम्हाला पुन्हा एकदा विकेंद्रीत जलसंधारणाच्या कामाचं महत्त्व समजलं. निवडलेल्या ७६ तालुक्यांमधील गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन त्यांच्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, अशी कळकळीची विनंती मी सर्व गावांना करत आहे', असं पानी फाउंडेशनचा संस्थापक आणि अभिनेता आमिर खानने म्हटलं आहे.

Web Title: 'Water Foundation''s 'Satyamev Jayate Water Cup 2019' competition is announced