जिल्ह्याच्या पूर्व भागात तीव्र टंचाई (व्हिडिओ)

जिल्ह्याच्या पूर्व भागात तीव्र टंचाई (व्हिडिओ)

बारामती - जिल्ह्यात डिसेंबरच्या सुरवातीलाच २३ टॅंकर सुरू झाले आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर तालुक्‍यांत दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. उसाचे घटलेले क्षेत्र, खोल गेलेल्या विहिरी आणि रब्बीचा झालेला चोळामोळा हे सध्याच्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळाचे विदारक चित्र आहे. 

जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार हेक्‍टरचे क्षेत्र असलेल्या रब्बी हंगामात केवळ ५७ हजार हेक्‍टर एवढ्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत, तर डिसेंबर महिन्यापूर्वीच रब्बीच्या पेरण्यांची आशा शेतकऱ्यांनी सोडली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदरचा काही भाग व शिरूर हे तालुके उसाच्या पट्ट्याचे तालुके आहेत. मात्र, या तालुक्‍यांतील दुष्काळाच्या भीषण स्थितीमुळे सध्या येथेही चित्र विदारक आहे. उसाचे आडसाली, सुरू, पूर्वहंगामी लागवडीचे जिल्ह्यातील क्षेत्र सरासरी ३ लाख २१ हजार एकर असताना आतापर्यंत केवळ ८४ हजार ४५० एकरांपर्यंतच उसाची लागवड झाली आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई पिके सहनच करू शकणार नसल्याने शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीचा हात आखडता घेतला आहे.  इंदापूर, बारामती तालुक्‍यात तर खोल चाललेल्या विहिरी व अगदी अर्ध्या ते एका तासावर विहिरींचे पाणी आल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. चाऱ्याची पिकेही आता करता येणार नसल्याने ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचे काय करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आतापासूनच आ वासून उभा आहे.

ज्वारीची ४६ हजार ४०० हेक्‍टरवर पेरणी
जिल्ह्यातील १७ गावे व १९१ वाड्या-वस्त्यांसाठी सध्या २३ टॅंकर सुरू आहेत. बारामतीत १०, शिरूरमध्ये ८, पुरंदर व जुन्नरमध्ये प्रत्येकी २, तर दौंड तालुक्‍यात १ टॅंकर सध्या सुरू आहे. रब्बीतील कडधान्य, ज्वारी, गव्हापासून ते हरभऱ्यापर्यंतची सारी पिके सध्या दयनीय अशा स्थिती आहेत. विशेषतः इंदापूर, बारामती, दौंड व पुरंदरच्या काही भागांतही शेतकऱ्यांनी धूळपेरणीवर व थोड्या ओलीवर केलेली पेरणी वाया गेली. जिल्ह्यात आतापर्यंत रब्बीसाठी ज्वारीची ४६ हजार ४०० हेक्‍टर पेरणी झाल्याचे आकडे कृषी विभाग सांगत आहे.

इंदापूर तालुक्‍यात सध्याची दुष्काळी व संभाव्य दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे सात कोटी ५० लाख दुष्काळ व्यवस्थापन आराखडा सादर केला आहे. सध्या झगडेवाडी, व्याहाळी, वकीलवस्ती या गावांचेच टंचाईचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आहेत.
- माणिक बिचकुले, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, इंदापूर

बोरीतील द्राक्षबागा सध्या केवळ शेततळ्यांवर तग धरून आहेत. म्हणूनच या वर्षी जरा चिंता वाटते आहे. गेल्या दहा वर्षांत एवढी टंचाई कधी जाणवली नव्हती, त्यामुळे सध्याची स्थिती लक्षात घेता उन्हाळ्यात नेमकी कशी स्थिती असेल या चिंतेत शेतकरी आहेत. 
- रामचंद्र शिंदे, द्राक्ष बागायतदार, बोरी, ता. इंदापूर

रब्बी व खरिपात काहीच पेरणी गावात झाली नाही. गावात आता प्यायला पाणी नाही. दिवसभर पाणी आणूनच बायका दमतात. एक टॅंकर गावात सुरू आहे. चाऱ्याचेच नियोजन होणार नाही असे चित्र दिसत आहे. 
- सतीश जांबले,  वासुंदे, ता. दौंड

शिरूर तालुक्यात पाणीप्रश्‍न गंभीर
शिक्रापूर - शिरूर तालुक्‍यात भीषण दुष्काळी स्थिती आहे. सध्या ८ टॅंकरने सहा गावांना पाणीपुरवठा होत असला, तरी पुढील आठवड्यात आणखी आठ टॅंकर अपेक्षित आहेत. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि भैरवनाथ पतसंस्थेकडून दोन टॅंकर सुरू आहेत.

थिटेवाडी बंधारा पूर्ण कोरडा, तर अन्य स्रोतांमध्ये चासकमान, डिंभे, घोड प्रकल्पांच्या आवर्तनावर कालवा परिसरातील गावांची भिस्त आहे. रब्बीचे आवर्तन नुकतेच पूर्ण होऊन पुन्हा पुढील आवर्तनाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. तालुक्‍यातील बहुतेक जलस्रोत हे चासकमान, थिटेवाडी, डिंभे प्रकल्पाच्या पाणी आवर्तनावरच अवलंबून आहेत. इतर जलस्रोत मात्र पूर्ण कोरडे पडलेले आहेत, तर थिटेवाडी बंधाऱ्यात यावर्षी पाणीच आले नाही. 

जनावरांची अवस्था 
शिरूर तालुक्‍यात साधारण ९९ हजार २१२ इतकी गाई व म्हैसवर्गातील दुभत्या जनावरांची संख्या असून, शेळी-मेंढी वर्गातील जनावरे साधारण ८१ हजार २६२ इतकी आहेत. गाय आणि म्हैस वर्गातील एक वर्षापर्यंत वयाची लहान जनावरे साधारण २४ हजार ८०३ इतकी आहेत. या सर्व जनावरांना दैनंदिन २१२२ टन चारा आवश्‍यक असून, तूर्तास जेमतेम स्थितीत जनावरांना हा चारा उपलब्ध होत असला, तरी पुढील अगदी काही दिवसांतच ही स्थिती गंभीर स्तरावर येऊन पोचणार असून, शासकीय चारापुरवठा अगदी तातडीने सुरू होण्याची गरज आहे. या सर्व पशुधनास दैनंदिन ४६ लाख ६५ हजार लिटर पाणी अपेक्षित आहे.  चाऱ्यासारखीच पाण्याचीही स्थिती अगदी गंभीर वळणावर असून, टॅंकरने पाणीपुरवठा तातडीने व्हावा अशी मागणी तालुक्‍यातील प्रत्येक गावातून आहे. 

दरम्यान, शिरूर तालुका दुष्काळसदृश म्हणून जाहीर झाल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पासांमध्ये १०० टक्के सवलतीचा लाभ मिळत आहे. विद्यार्थी मोफत पासची संख्या तीन हजार एवढी असल्याचे एसटी आगाराच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

पाणी योजनांची स्थिती बिकट
शिरूर तालुक्‍यातील एकूण ११९ महसुली गावांमध्ये एकूण पाणी योजना १३६ आहेत, तर त्यातील बंद पाणी योजनांची संख्या जवळपास निम्म्यावर आलेली आहे. एकूण १५७० एवढ्या विंधन विहिरींपैकी ८०० विंधन विहिरी पूर्ण बंद असून, उर्वरित बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 

एसटीचे ३००० विद्यार्थी सवलत मोफत पास, महावितरण वीजबिल सवलत याबाबत सूचना आल्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात या सर्व उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आढावा बैठक घेतली जाणार आहे.
- रणजित भोसले, तहसीलदार 

पुरंदरमध्ये निम्म्याच पेरण्या 
सासवड ः पुरंदर तालुक्‍यातील खरीप हंगाम नुकसानीत गेला, तर रब्बी हंगामही परतीच्या पावसाअभावी त्याच मार्गावर आहे. खरीप पेरणी सरासरीइतकी झाली होती. मात्र, रब्बी पेरणी निम्म्याने घटली आहे. सध्या दुष्काळाच्या तीव्रतेचा परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर झाली आहे. येत्या महिनाभरात ही तीव्रता पाणीटंचाईतून गतीने पुढे येईल, अशी स्थिती आहे. 

पुरंदर तालुक्‍यात यंदा ७१ टक्केच पाऊस झाला. सध्या पीकवाढ खुंटलेली आहे, त्यामुळे पावसाअभावी पीक नुकसान व नापेर क्षेत्र यांच्या वस्तुस्थितीतील नुकसानीची नोंद घेणे सरकारी यंत्रणेवर अवलंबून आहे. तालुक्‍यात सध्या दोन टॅंकरद्वारे सोनोरीला पाणीपुरवठा सुरू आहे. वाल्हे, वीर गावच्या वाड्या, राख, पांडेश्वर, रोमणवाडीच्या वाड्या व दिवे, झेंडेवाडी गावची पिण्याच्या पाण्यासाठी मागणी आहे. मधल्या वळवाच्या पावसाने थोडा दिलासा दिला, अन्यथा आताच टॅंकर मागणी वाढली असती. जलयुक्त शिवार अभियान, पाणी फाउंडेशन, सकाळ रिलीफ फंड व गावकरी श्रमदान जिथे झाले, त्या गावांत मात्र बऱ्या पावसानेही थोडा दिलासा मिळाल्याचे जाणवत आहे. तरीही पुढील काळात टंचाईस्थितीला सामोरे जाण्याची साऱ्यांनाच तयारी ठेवावी लागेल.  राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याबाबत प्रांत संजय असवले, तहसीलदार अतुल म्हेत्रे व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. 

 पीक नुकसानीचे हंगामनिहाय अहवाल कृषी व महसूलने सरकारला नीट द्यावेत. शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे, त्यामुळे टंचाई अहवाल केला गेला आहे. अधिकाधिक उपाययोजना करा, अशा सूचना शिवतारे यांनी केल्या आहेत.

टंचाई आराखड्यात नऊ उपाययोजनांसाठी ९.३८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एमआरईजीएसमधून मजुरांना कामे देण्यासाठी ६३९ कामे तयार ठेवली आहेत. मात्र, कामांची सध्या तरी मागणी नाही. 
- मिलिंद टोणपे, गट विकास अधिकारी 

हे करणे गरजेचे...
- पुरंदर तालुका दुष्काळी यादीत आहे, मात्र तीव्र दुष्काळ यादीत आला पाहिजे 
- तालुक्‍यात विविध फळबागा आहेत, त्या दुष्काळात वाचविण्यासाठी पुनर्वसन खात्याकडून वेगळी मदत हवी
- महिनाभर पुरेल एवढाच चारा असल्याने चारा डेपोचे नियोजन तयार ठेवण्याची यंत्रणेला गरज 
- कृषी विभागाने जिथे थोडे पाणी असेल, तिथे चारा पिकाला मोफत बियाण्यासह प्रोत्साहन देणे गरजेचे 
- प्रादेशिक नळपाणी योजना जिल्हा परिषदेने चालविण्यास घेणे गरजेचे व नादुरुस्त योजनांना हवा निधी

खेडमध्ये कांदाउत्पादक चिंतेत 
राजगुरुनगर : खेड तालुक्‍यात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. रब्बीच्या पिकांची उगवण अत्यल्प असून, पाणीटंचाई आणि चाराटंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. विहिरींची पाणीपातळी खालावल्याने प्रमुख नगदी पीक असलेल्या कांदापिकाला पाणीटंचाई जाणवू लागली असून, उत्पादक चिंतेत आहेत. 
तालुक्‍यात रब्बीच्या पेरण्या २८ टक्‍क्‍यांपर्यंत गेल्या आहेत. त्यातही पिकांची उगवण कमी आहे. त्यामुळे खरिपापाठोपाठ रब्बीही गेल्यात जमा आहे. सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर महिने पूर्णपणे कोरडे गेल्यामुळे नेहमीप्रमाणे विहिरी भरलेल्या नसल्याने कांदा व इतर भाजीपाला पिकांचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे लोकांनी कांदा कमी करून भविष्यात जनावरांना चारा कमी पडण्याचा अंदाज बांधून चारापिके घेतली आहेत. त्यांचीही उगवण कमी प्रमाणात असल्याने चाराटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्याचा परिणाम होऊन दूधउत्पादनही घटणार आहे. मात्र, तालुक्‍यात सातशे मेट्रिक टन चारा उपलब्ध असून,

टंचाई भासणार नाही, असा प्रशासनाचा दावा आहे. तालुक्‍यात रब्बी हंगामात गहू, हरभरा व कडधान्ये घेतली जातात. त्यांचे उत्पादन घटणार असल्याने नुकसान होणार आहे. 

तालुक्‍यात खरिपाच्या पेरण्या-८१ टक्के झाल्या होत्या. त्यापैकी सोयाबीन कसेबसे आले आहे. मात्र, पावसाळ्याच्या उत्तरार्धात पावसाने ओढ दिल्याने भात निसवण्याच्या काळात पिकाला फटका बसला आणि उत्पादन निम्म्याने घटले आहे. 

खेड तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी सर्व पक्षांनी आणि संघटनांनी आणि आमदार सुरेश गोरे यांनीही केली आहे. तरी फक्त कनेरसर, पिंपळगाव, चाकण आणि आळंदी मंडल दुष्काळी जाहीर झाले आहेत.  

तालुक्‍यातून टॅंकर मागणीचे प्रस्ताव येऊ लागले आहेत. कनेरसरचा प्रस्ताव दाखल झाला आहे. साधारण आठ गावे आणि शंभरावर वाडया-वस्त्यांना टॅंकरने पाणी पुरवावे लागण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. तसे प्रस्ताव पाठविल्याचे तहसीलदार सुचित्रा आमले यांनी सांगितले. 

चाराटंचाईचा सामना करण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांना मका व इतर चारा पिकांसाठी मोफत बियाणे देऊन प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पाटाचे पाणी न वापरता ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करावा, यासाठी प्रोत्साहन देत आहोत. इच्छुक शेतकऱ्यांकडून ५० टक्के सबसिडीसाठी अर्ज भरून घेत आहोत. बंधारे, तलाव इत्यादी जलस्त्रोतांमधून अनधिकृत पाणीउपसा करणाऱ्यांचे वीजजोड तोडण्यात येणार आहेत.
- लक्ष्मण होटकर, तालुका कृषी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com