राज्यात टँकरची हजाराकडे वाटचाल 

तात्या लांडगे
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

राज्यातील 151 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी सरकारची धावपळ सुरु असताना आता पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु झाली आहे.

सोलापूर : सद्यस्थितीत राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये एकूण 692 पाणी टॅंकर सुरु झाले आहेत. त्यामध्ये 567 गावे आणि एक हजार 117 वाड्यांवर टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात 117 टॅंकर वाढले आहेत. 

राज्यातील 151 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी सरकारची धावपळ सुरु असताना आता पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु झाली आहे. अनेक जिल्ह्यांची पाणीपातळी दोन-अडीच मीटरने घटली असून त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे टॅंकर सुरु करण्याची मागणीही वाढत आहे. सप्टेंबर-ऑक्‍टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात टॅंकरमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. सध्या सुरु झालेल्या टॅंकरमध्ये फक्‍त 109 टॅंकर शासकीय आहेत.

दुसरीकडे मात्र 583 टॅंकर खासगी आहेत. प्रत्येक दिवशी टॅंकरवर सुमारे चार ते साडेचार हजार रुपयांचा खर्च होतोय. त्यानुसार सध्या सुरु झालेल्या टॅंकरवर दररोज तब्बल दोन कोटी 76 लाख 80 हजार रुपयांचा खर्च होत आहे. आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. 

जिल्हानिहाय टॅंकर 
औरंगाबाद : 304 
अहमदनगर : 172 
नाशिक : 77 
जालना : 45 
सातारा : 25 
जळगाव : 19 
पुणे : 15 
बुलढाणा : 10 
बीड : 10 
धुळे : 7 
सांगली : 3 
सोलापूर : 2 
नांदेड : 2 
उस्मानाबाद : 1

Web Title: water tanker supply in Maharashtra