टॅंकरद्वारे ३२ लाख नागरिकांना पाणी

तात्या लांडगे
मंगळवार, 9 एप्रिल 2019

राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना दर आठवड्याला सुमारे २५० टॅंकर वाढत आहेत. नागरिकांची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, त्यानुसार जून महिन्यापर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.
- य. टे. पाडवी, उपसचिव, पाणी व पुरवठा स्वच्छता विभाग, मुंबई

तीन हजार ९७० टॅंकरवर १३० कोटींचा खर्च
सोलापूर - राज्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने टॅंकरची मागणीही वाढत आहे. राज्यात औरंगाबाद विभागात सर्वाधिक दोन हजार १८५ टॅंकर तर उर्वरित विभागात एक हजार ७८५ टॅंकर सुरू झाले आहेत. आतापर्यंत राज्यातील ३२ लाख १९ हजार नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिली.

राज्यात अनेक सिंचन प्रकल्प प्रलंबित असून पाइपलाइन करून पाणीपुरवठा करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी आतापर्यंत १३० कोटी ३७ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये टॅंकरची किंमत वाढविण्यात आली. दर आठवड्याला राज्यात २५० ते ३०० टॅंकर वाढत आहेत.

दुसरीकडे चाऱ्याअभावी जनावरांची वणवण सुरू असतानाही गावनिहाय छावण्या सुरू करण्याचा निर्णय कागदावरच असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. राज्यात जून महिन्यापर्यंत आणखी अडीच हजार टॅंकर सुरू होतील. त्यातून ३० ते ३५ लाख नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Water Tanker Water Shortage