
Rain Update : नांदेडमध्ये वादळी पावसासह तुफान गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावला
पुणे : वादळी वारे, जोरदार पाऊस आणि गारपिटीने राज्याच्या विविध भागांना तडाखा दिला आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काही भागांत तुफान गारपीट झाली. या अस्मानी संकटात रब्बी पिके, फळबागा, भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. या पावसाने पिके जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
नांदेड जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तुफान वादळ वाऱ्यासह गारपिटीमुळे केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यासोबतच रब्बी पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वीज पडून नागरिक जखमी झाले, तर जनावरेही दगावले आहेत.
मुदखेड तालुक्यातील बारड, निवघा, पाटनूर, खांबाळा, जावरा मुरार, चोरंबा, नागेली, पाथरड, बोरगाव, नांद्री, मुगट, आमदुरा, शंखतीर्थ, चीत गिरी, शेंबोली, पांढरवाडी, वैजापूर, पार्डी, गोबरा तांडा, तिरकसवाडी आदी गावांसह परिसरात गारपिटीने नुकसान झाले.
मराठवाड्यात दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक गारपीटही झाली. नैसर्गिक आपत्तीच्या या संकटाने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
मराठवाड्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा व गेवराई तालुक्यांत पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. पावसांसोबत गारांचाही तडाखा बसल्याने टरबूज, गहू, ज्वारी, फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मंठा तालुक्यातील तळणी येथे गुरुवारी दुपारी गारपीट झाली.
खानदेशात बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. जळगाव, चोपडा, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य व्यापाऱ्यांना इतरत्र हलवावे लागले. शुक्रवारी (ता. १७) देखील सकाळी ढगाळ व पावसाळी वातावरण होते. काही भागांत तुरळक पाऊसही झाला. काढणी, मळणीची कामे ठप्प आहेत.
पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, बारामती, दौंड, वेल्हे, इंदापूर, पुरंदर, भोर या तालुक्यांत झालेल्या वादळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. नगर जिल्ह्यातील अनेक भागांत काल वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह आंबा, द्राक्ष, संत्री-मोसंबी या फळ बागांचे नुकसान झाले.
वीज पडून पाच जणांचा ठार
परभणी : परभणी जिल्ह्यातील साडेगाव, शेळगाव, उखळी खुर्द आणि उखळी बुद्रुक येथे चार घटनांमध्ये वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले. यापैकी तिघे गंभीर आहेत. गंगाखेड तालुक्यातील उखळी खुर्द येथील शेतात वीज पडल्यामुळे बाळासाहेब फड (वय ५०), जयवंत नागरगोजे (वय ३४) या दोघांचा मृत्यू झाला.
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे ओंकार भागवत शिंदे (वय १५), परभणी तालुक्यातील साडेगाव येथील केशव नहातकर (वय ५०) यांचा आणि सोनपेठ तालुक्यातील उखळी बुद्रुक येथील नीता सावंत (वय ३०) यांचा वीज पडून मृत्यू झाला.