Video : बापरे... कोण आणि कसा आला आहे तो, ज्यामुळे शेतकऱ्यांवर ओढवले संकट

What damage is done to agriculture by lousts
What damage is done to agriculture by lousts

शेतकरी आयुष्यभर इतरांच्या हितासाठी झटत असतो, पण हे सर्व होत असताना त्याच्या आयुष्यात बाधा निर्माण करणाऱ्या असंख्य गोष्टी असतात. देशात करोना व्हायरसचे संकट सुरु असतानाच गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांत टोळचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.  टोळ कीटकांच्या झुंडीच्या झुंडी शेतात प्रवेश केला असून शेतातील पिकांवर आक्रमण करत आहेत. सरकारच्या कृषी आयुक्तालयाने टोळच्या संभाव्य प्रादुर्भावावर नियंत्रणाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी परिपत्रक काढले आहे.
काही दिवसांपासून गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांत टोळचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या टोळचे थवे ताशी १२ ते १६ किमी इतक्या वेगाने उडतात. ही टोळ दूरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासून धोका असतो. ही कीड तिच्या मार्गातील वनस्पतींची हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदिंचा फडशा पाडत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. 

ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेलगत असलेल्या पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगांव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, व गोंदिया जिल्ह्यांत टोळच्या प्रादुर्भावाबाबत जागृकता निर्माण करणे आवश्यक आहे. या किडीपासून नूकसान टाळण्याच्या दृष्टीने प्रादुर्भावापूर्वीच खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. आपण स्वतः तसेच सर्व क्षेत्रीय यंत्रणेने सतर्क  राहिले पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये विविध माध्यमे त्याचबरोबर शेतकरी प्रशिक्षणाद्वारे व्यापक जनजागृती केली पाहिजे.‌ यावर उपाययोजना करण्याबाबत शेतकऱ्यांना उद्युक्त केले पाहिजे असे परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

असा आहे टोळचा जीवनक्रम
टोळांच्या जीवनात तीन अवस्था असतात. त्यांची अंडी, पिल्ले अगर बाल्यावस्था आणि पूर्ण वाढ झालेली प्रौढावस्था तसेच त्यातील अंड्याची अवस्था जमिनीत असते. मादी ५० ते १०० अंड्यांच्या पुंजक्याने ओलसर रेताड जमिनीत अंडी घालते. अंडी साधारणपणे हवामानाप्रमाणे दोन ते चार आठवडयांनी फुटून त्यातून पिले बाहेर पडतात. जमिनीतील ओलावा व हवेतील उष्णतामान यावर अंड्याच्या अवस्थेचा काळ अवलंबून असतो. अंड्यातून बाहेर पडलेल्या लहान टोळाना (पिल्लांना) पंख फुटलेले नसतात. लहान टोळ वाढत असताना ३ ते ५ दिवसांच्या अंतराने पाच वेळा कात टाकतात. असे वाढत असतानाच त्यांना पंख फुटतात. किडीची ही अवस्था (बाल्यावस्था) ४ ते ६ आठवडे राहते. अंडयातून बाहेर पडल्यानंतर वाढीच्या अवस्थेत कीड खालीलप्रमाणे ४ ते ५ वेळा कात टाकते.

  • एकूण आहेत पाच अवस्था
  • - प्रथम अवस्था- टोळच्या अंडयातून नुकतीच बाहेर पडलेले पिल्लू पांढरे असते व एक-दोन तासात काळ्या रंगाचे होते.
  • - दुसरी अवस्था- या किड्यांचे डोके मोठे व चटकन लक्षात येणारा फिकट गुलाबी रंगांचा असतो.
  • - तिसरी अवस्था- टोळ किड्यांच्या छातीच्या दोन्ही बाजूस दोन पंखांच्या जोडी बाहेर पडण्याची स्थिती असते. 
  • - चौथी अवस्था- त्यांचा विशिष्ट काळा व पिवळा रंग
  • - पाचवी अवस्था- विशिष्ट तेजस्वी पिवळा व काळ्या रंगाचा पॅटर्न असतो. 
  • हे आहेत नूकसानीचे प्रकार : 

टोळची सर्व पिल्ले एकत्र येवून मोठ्या थव्याने शेतातील पिकांवर फडशा उडवत पुढे जातात. टोळाचे थवे ताशी १२ ते १६ किमी वेगाने उडतात.
अशाप्रकारे हे थवे पुढे सरकत असताना सायंकाळ झाल्यावर झाडा-झुडपांमध्ये वस्तीस राहतात. पूर्ण वाढलेले थव्याच्या स्थितीतील प्रौद्ध टोळ तांबूस रंगाचे असतात. ते अतिशय चपळ व खादाडी असतात. ही टोळ पिकांचे जास्तीत जास्त नुकसान करते. शिवाय ही टोळ दूरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासून फार मोठा धोका असतो. हिरवी पाने, फुले, फळे, बिया फांदी व पालवी आदिंचा टोल फडशा पाडत असतात. एका दिवसात टोळ त्यांच्या वजनाएवढे अन्न खात असते. एक चौरस किमी क्षेत्रात जर टोळ असेल तर त्यामध्ये जवळजवळ तीन हजार क्विंटल टोळ असतात. बाल्यावस्थेतील पिल्ले त्यांच्या वजनापेक्षा ६ ते ८ पटीने जास्त अन्न खातात.
तांबूस टोळ पुर्णावस्थेत पोहोचल्यावर पिवळ्या रंगाचे होतात. असे पिवळे टोळ अंडी घालण्यास अनुकूल अशी ओलसर रेताड जमिनीच्या शोधात फिरतात. 
यामुळे नुकसानीची पातळी दहा हजार प्रौढ टोळधाड हे हेक्टर इतकं नुकसान करतात तर पाच-सहा पिल्ले झुडुपांचे नुकसान करतात. अशा कोणत्याही स्थितीतील किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्यावर जाते. त्यावेळी लगेचच व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. टोळकिडीची संख्या तसेच प्रमाण विखुरलेले असल्यास नियंत्रणाच्या उपाययोजना करणे प्रभावी ठरत नाही. तसेच ते पर्यावरणासाठी हानीकारक ठरु शकते.

यावरील नियंत्रणासाठी उपाय : 
१) टोळने अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिलांना अटकाव करुन नियंत्रण करता येते. ती अंडी शोधून सामूहिकरित्या नष्ट करावीत.
२)  टोळांची सवय थव्या-थव्याने एका दिशेने दौडत जाण्याची आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या थव्यांच्या वाटेवर ६० सेमी रुंद व ७५ सेमी खोल चर खणून त्यात या पिलांना पकडता येते.
३) सायंकाळी/रात्रीच्या वेळी झाडा झुडपांवर टोळ जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्याने नियंत्रण होते.
४) थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्यास नीम तेल प्रति हेक्टरी २.५ लिटर फवारणी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
५) विष आमिशाचा वापर-  गहू किंवा भाताचे तूस यामध्ये फिप्रोनील ५ एस.सी. व २.९२ ई.सी. व त्यामध्ये किडीस आकर्षित करण्यासाठी मळी मिसळून रात्री किडीने आश्रय घेतलेल्या झाडाच्या आजुबाजूस किंवा प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये प्रति हेक्टरी २०-३० किलो याप्रमाणे फोकून द्यावे. जेणेकरुन, सदर आमिष खाल्ल्यावर किडीचा मृत्यु होईल.
६) मेटा-हायझीयम ॲक्रीडीयम व मायक्रोस्पोरीयम, पॅरानोसेमा लोकस्टी (पूर्वीचे नाव नोसेमा लोकस्टी) या जैविक किटकनाशकांचा वापर अनेक देशांत केला जातो.
७) मिधील पॅराथीआन २ टक्के भूकटी २५ ते ३० किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी.
८) बेंडीओकार्ब ८० डब्ल्यु.पी. क्लोरोपायरीफॉस २० ई.सी., ५० ई.सी. डेल्टामेथ्रीन २.८ युएलव्ही व १.२५ युएलव्ही, डायफ्लुबेंझुरॉन २५ ई.सी. लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ५ ई.सी. व १० डब्ल्यू.पी., मॅलाथिऑन ५० ई.सी. २५ ई.सी. व ९५ युएलव्ही या किटकनाशकांची टोळ नियंत्रणासाठी शिफारस अलिकडेच केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने केलेली आहे.

मोर्शी तालुक्यातील कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे म्हणाले की, शेतामध्ये पॉवरस्प्रे मशीनने फवारणी केल्यास ५५ टक्के पीक नियंत्रण राहू शकते. टोळ पिकावर समूहाने आक्रमण करतो. एका समूहामध्ये टोळ्यांची संख्या करोडोंनी असते. ती संख्या पाच ते दहा किलोमीटर दूर अंतरावर पसरते. या पूर्ण क्षेत्रावर नियंत्रण करण्यासाठी ड्रोनद्वारे क्‍लोरोपायरीफॉस तक्के व साईपरमेथ्रीन ही रासायनिक औषधी एका लिटर पाण्यामध्ये चार मिलीचे मिश्रण बनवून फवारणी केल्यास उपयोगी ठरू शकते. ट्रॅक्‍टरला पॉवरस्प्रे मशीन लावून फवारणी केल्यास ५५ टक्के नियंत्रण केले जाऊ शकते. तसेच यावेळी अमरावती मधील माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, शेतकऱ्यांवर आलेल्या टोळधाडीवरील संकटावर अग्निशमन यंत्राने फवारणी करून प्रभावी उपाययोजना करावी. 

टोळ म्हणजे काय?
टोळ हा नाकतोड्याचा एक प्रकार आहे. यास इंग्रजीत 'लोकस्ट' असे म्हणतात. टोळ प्रजातीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रजनन क्षमता असते.
शेतीसाठी ही टोळधाड इतकी घातक असते, की एक टोळधाड काही क्षणातच संपूर्ण शेत खाऊन मोकळे करते. 

कसा दिसतो टोळ?
टोळचे शरीर अरुंद, लांब, दंडगोलाकार आणि व्दिपार्श्वसममित असून लांबी ८ सेंमी. पर्यंत वाढू शकते. रंग पिवळा, तपकिरी, हिरवट वा राखाडी असून त्यावर वेगवेगळ्या रंगांचे ठिपके व रेषा असतात. शरीराचे डोके, वक्ष व उदर असे तीन भाग असतात. डोळे मोठे असून मुखांगे गवत व पाने चावण्यायोग्य असतात. शृंगिका आखूड असतात. वक्ष भागात पायांच्या तीन जोड्या असतात.

येथून आले टोळ कीड 
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश इ. पश्चिम राज्यात या टोळधाडीचे प्रमाण अधिक प्रमाणात असून नुकतीच पाकिस्तानमध्ये सुरू झालेलं टोळधाडीचं सत्र भारताला येऊन धडकलं आहे. टोळ शेतात दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. या नवीन संकटापासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण कसे करावे, या प्रश्नाच्या शोधात शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

टोळचे हे आहेत प्रजाती
टोळधाड हा प्रकार असून याशिवाय मायग्रेटरी लोकस्ट, बॉम्बे लोकस्ट आणि ट्री लोकस्ट या तीन अजून टोळ प्रजाती भारतात आढळतात.

टोळ असे करतो पिकांचे नुकसान
टोळ कीटकांच्या  झुंडीच्या झुंडी शेतांवर आक्रमण करतात.  ते सरळ सरळ पिकांवर जाऊन बसतात. अगदी शेंड्यापासून ते खोडापर्यंत ते पिकाच्या प्रत्येक झाडावर जाऊन बसून पिकांचे नुकसान करतात.

टोळने केले इतके नुकसान
गावातील शिवारात टोळधाड किडे आल्याने शेतातील मोसंबी, लिंबू, भाजीपाला, संत्राझाडे, संत्राबहार, मका, पनेरी याची पाने फस्त करून नुकसान करीत आहे. टोळधाडीमध्ये कोट्यवधी संख्येने नाकतोडे असल्याने ते एकाचवेळी पाच ते दहा किलोमीटर परिघातील शेकडो एकर शेतीतील टोळ सर्व प्रकारच्या झाडांची पाने कातरतात. यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत आहे. 

मुद्दे

  • - भारतात राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या राज्यांना टोळधाडीचा सर्वात जास्त धोका
  • - शेतक-यांचा टोळधाड मानला जातो सर्वांत मोठा शत्रू
  • - एका टोळधाडीत असतात कोट्यवधी किडे 
  • - काही वेळातच संपूर्ण शेत खाऊन करतात फस्त
  • - टोळधाड करतात काही क्षणांत पिकांचे नुकसान
  • - एक प्रौढ टोळधाड रोज स्वतःच्या वजनाइतकं म्हणजे साधारण दोन ग्रॅम अन्न खाऊ शकते 
  • - एका दिवसात टोळधाड कापु शकतात २०० किमी लांब अंतर
  • - साधारण ३५ हजार लोक किंवा २० उंट किंवा सहा हत्ती एका दिवसात खाऊ शकतील एवढं पीक हे टोळधाड काही क्षणातच फस्त करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com