सोलापूरच्या 'माध्यमिक' विभागात काय सुरु आहे? ३ महिन्यांत पाचवेळा बदलले शिक्षणाधिकारी; आता उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे जबाबदारी

माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांची बदली झाल्यापासून हा विभाग प्रभारीवरच चालू आहे. मारुती फडके यांच्या वैद्यकीय रजेचा अर्ज मंजूर झाल्यानंतर शिक्षणाधिकारीपदाची धुरा पुन्हा उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे सोपविली आहे.
Solapur ZP
Solapur ZPSakal

सोलापूर : प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून प्रसाद मिरकले यांनी उत्कृष्टपणे या विभागाचा पदभार सांभाळत आहेत. पण, माध्यमिक शिक्षण विभागातील गोंधळ अजून संपलेला नाही. तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांची बदली झाल्यापासून सतत हा विभाग प्रभारीवरच चालू आहे. मारुती फडके यांच्या वैद्यकीय रजेचा अर्ज मंजूर झाल्यानंतर शिक्षणाधिकारीपदाची धुरा पुन्हा एकदा उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच प्रकरणात अडकल्यानंतर या विभागाची जबाबदारी उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे सोपविण्यात आली. काही महिन्यांनी त्यांनी स्वत:हून त्या पदावर राहण्यास नकार दिला आणि जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे त्याची जबाबदारी सोपविली. त्यांनी प्रभावीपणे काम करीत हा विभाग व्यवस्थितपणे हाताळला.

मात्र, माध्यमिक शिक्षण विभागाकडे सध्या टप्पा अनुदानावरील शिक्षकांचे शालार्थ आयडी, नवीन शिक्षक भरतीपूर्वीची बिंदुनामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाला सादर करणे, असे विषय प्रलंबित असतानाही या विभागाला अद्याप स्थिर शिक्षणाधिकारी मिळालेला नाही. श्री. बाबर यांच्यानंतर जिल्हा महिला-बालकल्याण अधिकारी जावेद शेख यांच्याकडे काही दिवस या विभागाची जबाबदारी होती. त्यांच्या बदलीनंतर मारुती फडके यांची नेमणूक त्याठिकाणी झाली. मात्र, काही दिवसांतच त्यांनी वैद्यकीय कारण पुढे करून रजेचा अर्ज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यानंतर काही दिवस उपशिक्षणाधिकारी अंधारे यांच्याकडे तर काही दिवस महारुद्र नाळे यांच्याकडे या विभागाचा पदभार राहिला. तत्पूर्वी, श्री. फडके पुन्हा काही दिवस रुजू झाले होते. आता त्यांची रजा मंजूर झाल्याने नाळे यांच्याकडील पदभार पुन्हा तृप्ती अंधारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शिक्षकांचे प्रश्न राहिले बाजूलाच, पण या विभागाला पूर्णवेळ कायमचा स्थिर अधिकारी मिळू शकत नाही, याची खंत अनेक शिक्षकांना आहे.

‘शालार्थ आयडी’चा प्रश्न कधी मिटणार?

वर्षानुवर्षे शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांनाच पगाराविना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काहीजण निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तर काहीजण नोकरी सोडण्याच्या मनःस्थितीत आहेत. अशी दुरवस्था असतानाही टप्पा अनुदानावरील शिक्षकांच्या शालार्थ आयडीचे प्रस्ताव मार्गी लागलेले नाहीत. कार्यालयातील फाईल्स गायब झाल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा देखील दाखल झाला, तरीपण उपसंचालक स्तरावर हा प्रश्न प्रलंबितच आहे. त्या शिक्षकांना कधीपर्यंत न्याय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच तीन-चार महिन्यात तब्बल पाच शिक्षणाधिकारी बदलले आहेत, हे विशेष.

लिपिकाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन लिपिक संजय बानूर यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तशी मागणी केली होती. या समितीमध्ये कक्ष अधिकारी महेश रूपनर, कार्यालयीन अधीक्षक मेघराज कोरे व तजमुल मुत्तवली यांचा समावेश आहे. समितीने चौकशीचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com