चीनकडून करण्यात आलेला सायबर हल्ल्याचा प्रमुख उद्देश काय? पाहा व्हिडीओ

यश वैद्य
Tuesday, 2 March 2021

मुंबईतील या ब्लॅकआऊट मागे चीनचा हात असल्याचे समोर आले आहे.भारतातील लस बनवणाऱ्या अग्रणी संस्था भारत बायोटेक आणि सीरम इंस्टिट्यूट यांच्या सिस्टीमलासुद्धा  हॅक करण्याचा हा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे 

मुंबई: गेल्या १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोठा इलेक्ट्रिक फेल्युअर झालेला मुंबईकरांना अनुभवायला मिळाला होता.अचानक लाईट कशामुळे गेली याचे कारण कोणालाच माहित नव्हते अगदी MSEB ला सुद्धा. MSEB नेच याबाबत अधिक तपासाची मागणी सरकारकडे केली होती. यामध्ये कोणता बाह्य शक्तींचा हात आहे का? याबाबत चौकशी करावी अशी मागणी ऊर्जा विभागाकडून करण्यात आली त्यावेळेस ऊर्जा विभागाच्या मागणीनंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांमार्फत महत्त्वाची चौकशी करण्यात आली.सायबर पोलिसांनी 'SCADA' मध्ये ऍनालिसिस केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढलेले आहेत.मुंबईतील या ब्लॅकआऊट मागे चीनचा हात असल्याचे समोर आले आहे.भारतातील लस बनवणाऱ्या अग्रणी संस्था भारत बायोटेक आणि सीरम इंस्टिट्यूट यांच्या सिस्टीमलासुद्धा  हॅक करण्याचा हा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे 

 

कसा होता हा सायबर अटॅक ?

भारतातील पॉवरग्रीड फेल करण्याचा चीनचा प्रयत्न मुंबईसह संपूर्ण देश चीनला अंधारात टाकायचा होता. चिनी मालवेअर्सनी भारतातील वीज पुरवठा करणाऱ्या कंट्रोल सिस्टीममध्ये घुसखोरी केली आणि यामाध्यमातून हाय व्होल्टेज ट्रान्समिशन, सब स्टेशन आणि थर्मल पॉवरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. इलेक्ट्रिक फेल्युअर घडवण्यासाठी १४ ट्रोजन हॉर्सेस या सर्व्हिसमध्ये टाकण्यात आल्याचे काही पुरावे समोर आले आहेत. या अहवालात 8 GB डेटा ट्रान्स्फर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. ब्लॅकलिस्टेड म्हणजेच काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या इंटरनेट प्रोटोकॉल आयडी म्हणजेच IP वरून लॉगिन झाल्याचीही शक्यता या अहवालात वर्तवली गेलेली आहे.  

 

 

या सायबर अटॅकमागचा हेतू काय होता ?

कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. भारतात कोरोना लसीकरणाच्या मोहीमेदरम्यानच भारतीय लस उत्पादकांच्या आयटी सिस्टीमला हॅकर्सनी टार्गेट केलं आहे. भारतीय लस उत्पादकांच्या आयटी सिस्टीमला हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 
त्यांनी सांगितलंय की ज्या दोन लस उत्पादकांच्या आयटी सिस्टीमला हॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय त्यांच्या लसीचा उपयोग देशात सध्या लसीकरणासाठी करण्यात येतोय. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीची सप्लाय चेन खंडीत करण्याचा या हॅकर्सचा उद्देश आहे. सिंगापूर आणि टोकीयोमध्ये असणारी सायबर गुप्तचर कंपनी सायफार्माने म्हटलंय की, चीनी हॅकर्स ज्यांना स्टोन पांडा नावाने देखील ओळखलं जातं, त्यांनी भारत बायोटेक आणि सीरमच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सप्लाय चेन सॉफ्टवेअरमधील कच्चे दुवे आणि त्रुटी शोधण्याचे प्रयत्न केले आहेत, जेणेकरुन ते हॅक केले जाऊ शकतील. 

काय होता या सायबर हल्ल्यामागचा प्रमुख उद्देश?

भारतात  जगभरात विकल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या लसींचे 60 टक्क्यांहून अधिक उत्पादन होते . या पार्श्वभूमीवर चीन भारतातील लसीची सप्लाय चेन खंडीत करु इच्छितो. यामागील खरा उद्देश हा बौद्धिक संपदा चोरून घेणे आणि भारतीय औषध उत्पादक कंपन्यांशी स्पर्धात्मक फायदा मिळवणे हा आहे. 
यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. गृहमंत्र्यांनी  'न्यूयॉर्क टाइम्समध्ये' आलेल्या बातमीच्या पार्श्वभूमीवर  पत्रकार परिषद घेतली.सोबतच महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केलेल्या तपासाचा अधिकृत रिपोर्टदेखील अनिल देशमुख यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्त केला आहे.आता भारत चीनला कश्या रूपात उत्तर देईल आणि सुरक्षा यंत्रणा असे सायबर अटक रोखण्यासाठी काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the main purpose of cyber attack from China? Watch the video