‘एसटी’चे चाक जागेवरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एसटी’चे चाक जागेवरच

‘एसटी’चे चाक जागेवरच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अद्याप कायम आहे. राज्य सरकारने एकीकडे चर्चेची दारे खुली ठेवली असली तरीसुद्धा आंदोलक मात्र त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. भाजपचे नेते हे आंदोलन भडकवत असून कर्मचाऱ्यांना कामावर येण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज केला. परिवहन खात्याने आज पुन्हा ११३५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. यामुळे आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २०५३ वर पोचली आहे.

दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या व्यथा त्यांच्यासमोर सादर केल्या. संपकरी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन राज यांनी या वेळी केले. या आंदोलनाला आज काही ठिकाणी हिंसक वळण लागले. नाशिकमध्ये दोन शिवशाही बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. सांगलीमध्ये आज एका आंदोलक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. राजेंद्र पाटील (वय ४६) असे मरण पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते कवलापूरचे रहिवासी आहेत.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

राज्यातील काही आगारांमध्ये कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना काळे फासण्याची तसेच त्यांच्यावर बहिष्कार घालण्याची शपथ संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी या कामगारांना संरक्षण पुरविण्यात येईल असे जाहीर केले.

भाजप नेते मैदानात

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात बुधवारपासून ठिय्या मांडला आहे. भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी काल रात्री आझाद मैदानात कामगारांसोबत जेवण केले. तसेच, रात्री आंदोलनासाठी कामगार थांबत नसल्याने ठाणे, पालघर अशा नजीकच्या आगारातील कर्मचाऱ्यांनी रात्रपाळी करावी असे आदेश एसटी व्हॉट्सॲप ग्रुपवर फिरत होते. एसटी कामगारांच्या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री सदाभाऊ यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चाही केली. परंतु सदाभाऊ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन वेगळेच सांगितले, असा आरोप परब यांनी केला आहे.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

'सध्या नागरिकांची गैरसोय होत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विलीनीकरणाचा निर्णय दोन-चार दिवसांत घेण्यासारखा नाही, त्यामुळे आपण चर्चा करून मार्ग काढू या. मी काल सदाभाऊ खोतांशी चर्चा केली, त्यांना सगळे समजावून सांगितले; परंतु त्यांनी बाहेर येऊन माध्यमांना वेगळेच सांगितले.'

- अनिल परब, परिवहनमंत्री

loading image
go to top