आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर अधिकार कोणाचा? मुलगी सासरी गेली, तरी समान अधिकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mortgage property news
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर अधिकार कोणाचा? मुलगी सासरी गेली, तरी समान अधिकार

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर अधिकार कोणाचा? मुलगी सासरी गेली, तरी समान अधिकार

सोलापूर : आई-वडिलांनी स्वत: कमावलेली प्रॉपर्टी असल्यास त्याचे वाटप कसे व कोणाला करायचे, याचा संपूर्ण अधिकार त्यांनाच आहे. परंतु, मालमत्तेची वाटणी करण्यापूर्वीच संबंधित पालकाचा मृत्यू झाल्यास, त्या मालमत्तेवर मुला-मुलींचा समान अधिकार असतो. दुसरीकडे वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात मृत्यूपत्र करता येत नाही. त्यात मात्र मुलांप्रमाणे मुलीला देखील हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार तेवढाच अधिकार देण्यात आला आहे.

पहिली म्हणजे ज्या व्यक्तीने मालमत्ता स्वतः विकत घेतली आहे किंवा भेटवस्तू, देणगी किंवा एखाद्याने हक्क सोडल्यानंतर (जमिनीचा हिस्सा न घेणे) प्राप्त झाली आहे. अशा मालमत्तेला स्व-अधिग्रहित मालमत्ता म्हणतात. दुसऱ्या प्रकारची जमीन ही वडिलांना पूर्वजांकडून मिळाली आहे, ती जमीन वडिलोपार्जित संपत्तीच्या श्रेणीत ठेवली जाते. एखाद्या व्यक्तीने स्वतः जमीन खरेदी केली असेल. तर जमीन विकणे, दान करणे किंवा हस्तांतरित करण्यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यास तो स्वतंत्र आहे.

भारतीय उत्तराधिकार कायदा, मालमत्ता हस्तांतरण कायद्यात त्याचा उल्लेख आहे. वडिलांनी स्वत: घेतलेल्या जमिनीबाबत कोणीही त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकत नाही किंवा कोणीही त्याला दुसरा निर्णय घेण्यास भाग पाडू शकत नाही. स्वत: अधिग्रहित केलेल्या जमिनीवर कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त संबंधित व्यक्तीला आहे.

स्वत: अधिग्रहित केलेल्या जमीनचे मृत्युपत्र तयार करुन ती मालमत्ता ते कोणालाही देऊ शकतात. या प्रकरणाबाबत संबंधित व्यक्तीच्या मुलांनी कोर्टात धाव घेतली आणि मृत्यूपत्र पूर्णपणे वैध असल्यास, कोर्ट या प्रकरणात वडिलांच्या बाजूने निकाल देण्याची शक्यता असते.

स्वत:च्या जमिनीवर वारसाहक्क चालत नाही, पण...

वडिलांच्या स्व-अधिग्रहित मालमत्तेच्या हस्तांतरणाशी संबंधित अधिकार फक्त वडिलांकडेच राखीव आहेत. पण, यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे स्वत: घेतलेल्या जमिनीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास या जमिनीवर मुला-मुलींना कायदेशीर हक्क मिळतो. देशातील मालमत्तेच्या हक्काबाबत हिंदू आणि मुस्लिमांचे नियम वेगळे आहेत.

हिंदू उत्तराधिकार कायदा- १९५६ मध्ये, मुलगा आणि मुलगी दोघांनाही वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क देण्यात आले आहे. भारतीय सामाजिक परंपरांमुळे असंख्य मुली वडिलांच्या मालमत्तेवर दावा करत नाहीत. पण, हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ प्रमाणे मुलींनाही समान अधिकार आहे. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये या प्रकारच्या मालमत्तेवर पुत्रांना अधिक महत्त्व दिले आहे.

वडिलोपार्जित मालमत्तेवर मुला-मुलींचा समान हक्क

वडिलांनी घेतलेल्या मालमत्तेच्या मृत्यूपत्रात आपल्या मुलींना हक्क द्यायचा की नाही, ता त्या व्यक्तीचा अधिकार आहे. पण, वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत वडील मृत्युपत्र करू शकत नाहीत. अशास्थितीत या मालमत्तेवर मुला-मुलींचा हक्क असतो.

वडिलोपार्जित मालमत्तेबाबत निर्णय घेण्यास वडील स्वतंत्र नाहीत. वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलगा आणि मुलगी दोघांचा समान हक्क आहे. या मालमत्तेत पूर्वी मुलीला समान हक्क नव्हता. परंतु, २००५ मध्ये उत्तराधिकार कायद्यात महत्त्वाचे बदल करून मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत पुत्रांप्रमाणे समान हक्क मिळाले.

अन्याय झालेल्यांना न्याय मिळतोच

स्वत: कमावलेली मालमत्ता असल्यास मृत्यूपत्राने त्याची विल्हेवाट (वाटणी) करता येते. पण, संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतरच ते लागू होते. समजा, त्या व्यक्तीने मृत्यूपत्र केले नाही आणि तो अचानक दगावला, तर त्या मालमत्तेवरव पहिला हक्क पत्नीचा आणि त्यानंतर मुला-मुलांच्या प्रमाणात हिस्से पडतील. हिस्सा देताना कोणावर अन्याय झाल्यास तो व्यक्ती वाटणी मागण्याचा दावा न्यायालयात दाखल करू शकतो.

- ॲड. प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकिल, सोलापूर