दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

- अन्य काही पाहुणचार द्यायचा असेल तर तो पण स्विकारण्यास तयार 

- मी निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात फिरणार

मुंबई : महाराष्ट्र हे छत्रपतींचे राज्य आहे. या राज्यातील लोकांवर छत्रपतींचे जे संस्कार झाले आहेत, ते दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्याचे नाहीत. त्यामुळे आता दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर शरद पवार बोलत होते. पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केले. काल संध्याकाळपासून काही पत्रकार बंधूंनी एक माहिती माझ्या कानावर आली. की केंद्र सरकारच्या ईडीने राज्य सहकारी बँकेच्या संदर्भात माझ्यावर केस दाखल केली. माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग जळगांव ते अमरावती शेतकरी दिंडी काढली तेव्हा माझ्यावर खटला दाखल केला.
आता दुसऱ्यांदा असा प्रकार माझ्याबाबतीत घडला आहे.
या यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे.

मी निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात फिरणार आहे. त्यामुळे माझे वास्तव्य मुंबई बाहेर राहणार आहे. त्यामुळे मला जर ईडीला मला काही ‘प्रेमाचा संदेश‘ द्यायचा असेल अन् मी मुंबई बाहेर असेल तर मी कुठेतरी गायब झालो आहे, असा समज होवू नये म्हणून शुक्रवारी 27 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता मी ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. त्यांना हवी ती माहिती मी देईन. अन्य काही पाहुणचार द्यायचा असेल तर तो पण स्विकारण्यास तयार आहे.

मी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराचा व्यक्ती आहे. त्यामुळे मी सहकार्य करणार आहे. महाराष्ट्र हे छत्रपतींचे राज्य आहे. या राज्यातील लोकांवर छत्रपतींचे जे संस्कार झाले आहेत ते दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्याचे नाहीत. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढं झुकणार नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will not bow down to Delhi says NCP Chief Sharad Pawar