नाणार प्रकल्प लादणार नाही, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

या प्रकल्पासाठी मुंबई, निरी सारख्या संस्थांना प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास करण्याचे काम दिले आहे. याशिवाय आम्ही विरोधक, नागरिक व या प्रकल्पाशी संबंधित सर्वांशी चर्चा करण्यास तयार आहेत. जर हा विरोध कायम राहिला तर आम्ही हा प्रकल्प लादणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर : नाणारचा प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी व पर्यावरणपूरक असला, तरी नागरिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प लादणार नाही, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.13) विधान परिषदेत दिले. स्थानिकांच्या विरोधासह शिवसेना, तसेच विरोधी पक्षांनीही या प्रकल्पास विरोध दर्शवला होता. गेले काही दिवस विधान परिषदेतही या प्रकल्पाच्या निषेधार्थ घोषणाबाजी व गदारोळ सुरू होता. अखेरीस आज मुख्यमंत्र्यांनी या मुद्यावर सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ व नाणारवर हा प्रकल्प लादणार नाही अशी भूमिका मांडली.    

या प्रकल्पासाठी मुंबई, निरी सारख्या संस्थांना प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास करण्याचे काम दिले आहे. याशिवाय आम्ही विरोधक, नागरिक व या प्रकल्पाशी संबंधित सर्वांशी चर्चा करण्यास तयार आहेत. जर हा विरोध कायम राहिला तर आम्ही हा प्रकल्प लादणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

कोकणातील आंबा बागांचे या प्रकल्पामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प असल्याने कोणताही त्रास होणार नाही. यापूर्वी समृद्धी महामार्गालाही विरोध झाला होता, पण तो प्रश्न चर्चा करून सुटला. त्याप्रमाणेच नाणारचा ही विचार व्हावा व चर्चा करून हा मुद्दा हा सोडविण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. 

राज्य सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी प्रयत्न केले होते, तसेच या प्रकल्पासाठी तीन लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीची उपाययोजना करण्यात आली आहे. पण जिथे विरोध होतो तिथे प्रकल्प लादायचा नाही हे सरकारचे धोरण आहे, त्यामुळे सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

Web Title: will not impose nanar project we discuss with everyone said devendra fadanvis