मराठा आंदोलन : राज्यातील मराठा तरुणांचे बलिदान व्यर्थ जाणार?

दत्ता देशमुख
बुधवार, 19 जून 2019

मराठा आरक्षण आंदोलन
- बलिदान करणाऱ्या कुटूंबियांना मदतीच्या घोषणेचाही सरकारला विसर
- दहा लाखांची मदत आणि सरकारी नोकरीची घोषणा
- बीड जिल्ह्यात दहा जणांची आत्महत्या
- ‘सकाळ’च्या वृत्तानंतर निम्म्या कुटूंबियांना निम्मिच मदत

बीड : मराठा आरक्षणासाठी शांततेत लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केल्याने परळी येथून ठोक मोर्चाचे दुसरे पर्व सुरु झाले. संताप, जाळपोळ, तोडफोड करणाऱ्या समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी बलिदानही दिले. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटूंबियांना मदत आणि नोकरीच्या घोषणेचा सरकारला विसर पडला कि काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

बीड जिल्ह्यातील दहा तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिल्याची नोंद सरकारी दफ्तरी आहे. दहा लाख रुपयांची रोख मदत आणि कुटूंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा करुन आता वर्ष उलटत आले आहे. मात्र, दहा पैकी पाच कुटूंबियांना केवळ पाच-पाच लाख रुपयांचीच मदत हाती आली आहे. उर्वरित कुटूंबियांना मदत आणि राहीलेली अर्धी मदत तसेच नोकऱ्या कधी मिळणार असा प्रश्न आहे. 

अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे असल्याने सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यात लाखोंचा सहभाग असलेले मराठा क्रांती मोर्चे निघाले. सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने मागच्या वर्षी परळीतून ठोक मोर्चाचे दुसरे पर्व सुरु झाले.

सलग 21 दिवस झालेल्या ठिय्या आंदोलनाच्या दरम्यान राज्यभरात याचे तिव्र पडसाद उमटले आणि अनेक ठिकाणी मोर्चाला हिंसक वळणही लागले. याच आंदोलनादरम्यान औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतली. बघता बघता याचे लोण राज्यभरात पोचले आणि 41 तरुणांनी आरक्षण मागणीसाठी बलिदान दिले. जिल्ह्यातही दहा जणांनी या मागणीसाठी आपला जीव दिला. मात्र, आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटूंबियांबाबत केलेल्या घोषणेला वर्ष उलटत आले तरी मुहूर्त भेटला नाही त्यामुळे सरकारला याचा विसर तर पडला नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

घोषणा दला लाख आणि सरकारी नोकरीची 
मराठा आरक्षण आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांची रोख मदत आणि सरकारी नोकरीची घोषणा सरकारने केली होती. परिवहन महामंडळात नोकऱ्या देण्याचेही लोकसभा आचारसंहितेपूर्वी जाहीर केले होते. 

‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर निम्म्या कुटूंबियांना निम्मिच मदत
आरक्षण मागणीसाठी जिल्ह्यातील अभिजीत देशमुख, कानिफ येवले, मच्छिंद्र शिंदे, शिवाजी काटे, राहूल हावळे, दिगंबर कदम, एकनाथ पैठणे, अप्पासाहेब काटे, सरस्वती जाधव, दत्ता लंगे या दहा जणांनी बलिदान दिले. मार्च महिन्यात घोषणेला नऊ महिने उलटूनही कुठलीच मदत नसल्याने ता. आठ मार्चच्या अंकात ‘सकाळ’मधून ‘दहा तरुणांचे बलिदान व्यर्थ जाण्याची भिती’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. याच दिवशी या चार कुटूंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत झाली. दहा पैकी अभिजीत देशमुख, शिवाजी काटे, दिगंबर कदम, राहूल हावळे, मच्छिंद्र शिंदे यांच्या कुटूंबियांना निम्मी मदत भेटली आहे.

निम्मी मदत आणि नोकरीचे काय
दरम्यान, निम्म्या कुटूंबियांना दहा पैकी पाच लाख रुपयांची मदत भेटली आहे. त्यांचीही पाच लाखांची मदत बाकी आहे. तर, पाच कुटूंबियांना दमडीही भेटली नाही. तसेच, नोकरीबाबतही सरकारी पातळीवर कुठल्या हालचाली दिसत नाही. या अधिवेशनात याबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा बलिदान देणाऱ्या कुटूंबियांकडून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will the sacrifice of Maratha youngsters go in vain