ऍसिड हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदे करणार - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - ऍसिड हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकार कायद्यात आवश्‍यक ते बदल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "कॉन्फिडन्स वॉक' कार्यक्रमात सांगितले. तसेच, राज्य महिला आयोगाला ऍसिड हल्ला झालेल्या व्यक्तींसाठी बृहद्‌ आराखडा करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या. 

मुंबई - ऍसिड हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकार कायद्यात आवश्‍यक ते बदल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "कॉन्फिडन्स वॉक' कार्यक्रमात सांगितले. तसेच, राज्य महिला आयोगाला ऍसिड हल्ला झालेल्या व्यक्तींसाठी बृहद्‌ आराखडा करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या. 

वरळी येथे ऍसिड हल्ल्यातील पीडितांसाठी "दिव्यज फाउंडेशन' आणि राज्य महिला आयोगाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. ऍसिड हल्ले होऊ नयेत यासाठी कायदे कडक करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, ऍसिड हल्ला झालेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या मदतनिधीत वाढ करून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती त्यांनी या कार्यक्रमात दिली. 

मुंबई पोलिस आयुक्त दत्तात्रेय पडसळगीकर यांनी मुंबई पोलिस या गुन्ह्यांचा तपास वेगवान होण्यासाठी मदत करतील, असे आश्‍वासन दिले. तर, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले, की महापालिका रुग्णालयांमध्ये पीडितांना आवश्‍यक ते उपचार मोफत देण्याच्या सूचना देण्यात येतील. सोनाली बेंद्रे हिने ऍसिड विक्री बंद करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या ऍसिडचे ट्रॅकिंग झाले पाहिजे, असे सांगितले. 

महिला आयोगातर्फे तयार करण्यात आलेल्या "सक्षमा' पुस्तिकेचे प्रकाशन महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले; तर महिला आयोगाने "तेजस्विनी' या मोबाईल "ऍप'चे अनावरण केले. अभिनेत्री जुही चावला, साक्षी तन्वर, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, त्यांची मुलगी गिरिजा फडणवीस, अभिनेता विवेक ओबेरॉय, डॉ. अशोक गुप्ता आदी यात सहभागी झाले होते. 

Web Title: Will strict laws to prevent acid attacks