esakal | हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार? विधिमंडळ सचिव १८ ला घेणार आढावा
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळी अधिवेशन नागपुरात?

अधिवेशन नागपूरला होणार? विधिमंडळ सचिव १८ ला घेणार आढावा

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : हिवाळी अधिवेशन दोन महिन्यांवर आले आहे. यामुळे विधिमंडळ सचिव १८ ऑक्टोबरला विधानभवन येथे बैठक घेणार आहे. यावेळी ते कामाचा आढावा घेतील. त्यानंतरच हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार की नाही, हे स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येते.

नागपूर करारानुसार राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन उपराजधानीत घ्यायचे आहे. त्यानुसार साधारणतः हिवाळी अधिवेशन घेण्यात येते. परंतु, कोरोनामुळे मागील वर्षी हिवाळी अधिवेशन झाले नाही. यापूर्वीही चार ते पाच वेळा एकही अधिवेशन नागपूरला झाले नसल्याचे सांगण्यात येते. हिवाळी अधिवेशन न झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, कोरोनाचे कारण पुढे करत ते नाकारण्यात आले.

त्यानंतरचे पावसाळी अधिवेशनही मुंबईतच झाले. तिन्ही अधिवेशन जास्त कालावधीचे नव्हते. एक आठवडाभरही अधिवेशन झाले नाही. त्यामुळे तारांकित प्रश्नांसह विधिमंडळाचे अनेक कामकाज झाले नाही. सदस्यांना आपल्या भागातील प्रश्न, मुद्दे मांडता आले नसल्याने त्यांच्यात नाराजी होती. आता कोरोना बाधितांची संख्याही कमी झाली आहे. शाळाही सुरू झाल्या आहेत. धार्मिक स्थळेही उघडण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासकीय स्तरावर आहेत. त्या दृष्टिकोनातून कामाला लागण्याच्या अप्रत्यक्ष सूचना मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा: पाचही मुलीच झाल्याने तलाक, तलाक, तलाक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबरला विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत नागपूरला येणार आहे. ते अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार आहे. बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महानगरपालिका आयुक्तांसह बांधकाम व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती शासन स्तरावर देण्यात येईल. त्याआधारावरच हिवाळी अधिवेशन येथे होणार की नाही, ठरणार असल्याचे सांगण्यात येते.

loading image
go to top