esakal | ढिसाळ कारभार! प्रशिक्षण नाही मात्र, ST चालकांची ड्युटी ऑक्सिजन वाहतुकीवर!
sakal

बोलून बातमी शोधा

tanker

प्रशिक्षण नाही मात्र, ST चालकांची ड्युटी ऑक्सिजन वाहतुकीवर!

sakal_logo
By
प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई: ऑक्सिजन टँकर (oxygen tanker) पुरवठा करण्यासाठी एसटी महामंडळाच्या चालकांचा वापर केला जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांनी केली होती. मात्र, परिवहन विभागाने अद्याप एसटी महामंडळाला अधिकृत चालकांची मागणी केली नाही. परंतु, तरीदेखील सातारा विभागातून कोणतंही प्रशिक्षण न देता एसटीच्या चालकांना (ST Driver) ऑक्सिजन टँकर वाहतुकीच्या कामाला जुंपल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. (without Training ST Driver Staff work in oxygen tanker)

परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतर एसटी महामंडळाने 50 चालक आरक्षित केले, मात्र त्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. तर, परिवहन विभागाने सुद्धा अद्याप कोणतीही अधिकृत मागणी केली नाही. त्यामुळे एसटीच्या चालकांना अद्याप ऑक्सिजन टँकर्स वाहतुकीसाठी पाठविण्यात आले नाही. मात्र, नुकतेच सातारा विभागातील सुमारे 10 एसटी चालकांना ऑक्सिजन टँकरच्या कर्तव्यावर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चालकांना टँकर्सचा तांत्रिक अडचणीची कोणतीही प्राथमिक माहिती नसून, टँकर्स (tanker)चालविण्याचे विशेष प्रशिक्षण सुद्धा नसल्याची उघड झाले आहे.

हेही वाचा: एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक नॉटरिचेबल!

राज्याचे एसटी वाहतूक महाव्यवस्थापक संजय सुपेकर यांनीच यासंदर्भात खुलासा केला असून ट्रक किंवा इतर वाहन चालवण्यापेक्षा ऑक्सिजन टँकर चालवणे वेगळी गोष्ट आहे. वाहतुकीच्या दरम्यान टँकरमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास चालकाला प्राथमिक माहितीची गरज असते. त्यासाठी 3 दिवसाचे विशेष प्रशिक्षण आवश्यक आहे. त्याशिवाय चालकांना ऑक्सिजन टँकर वाहतुकीसाठी पाठवता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील अंदाधुंद कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उघड झाला आहे.

माहितीची सारवासारव

सातारा विभागाने 10 चालकांना ऑक्सिजन टँकर्सवर विना प्रशिक्षण कर्तव्यावर पाठवल्याची माहिती सकाळच्या हाती लागल्यानंतर वाहतूक महाव्यवस्थापक संजय सुपेकर याना विचारणा केली मात्र, राज्यात अद्याप एकाही चालकाला ऑक्सिजन टँकरच्या वाहतुकीसाठी पाठवलंच नसल्याचे त्यानी सांगितले, शिवाय सध्या 50 चालक आरक्षित करून ठेवले असून परिवाहन विभागाकडून अद्याप चालकाची मागणी केली नाही. मात्र, सातारा विभागातील माहिती त्यांना सांगितल्यानंतर चालकांना हेल्पर म्हणून पाठवल्याची सारवासारव त्यांनी केली.

संपादन : शर्वरी जोशी

loading image