esakal | Women's day 2021 : सोशल मीडियावर कसा आहे महिला आमदारांचा वावर? जाणून घ्या...

बोलून बातमी शोधा

Sakal2}

राज्यातील महिला राजकारणी आणि महिला आमदार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. 

Women's day 2021 : सोशल मीडियावर कसा आहे महिला आमदारांचा वावर? जाणून घ्या...
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

राजकीय व्यक्तींसाठी सोशल मीडिया हे प्रचाराचं एक प्रमुख साधन बनलं आहे. सोशल मीडियामुळं थेट जनतेशी कनेक्ट होता येत असल्यानं तसेच त्यांच्याकडून मिळणाऱ्या तात्काळ प्रतिसादामुळं कामाचं मुल्यमापनही करणं त्यांना शक्य झालं आहे. राज्यातील महिला राजकारणी आणि महिला आमदारही यात मागे नाहीत, त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. मात्र, हे करत असताना आपलं पद आणि सोशल मीडियावरचा वावर याबाबत मोठी तफावत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आलं आहे.

सोशल मीडियाच्या वापरात वाढ

मुंबईस्थित 'संपर्क' या संस्थेने संवेदनशील आणि प्रभावी अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर राज्यातील महिला आमदारांकडून कशासाठी आणि कसा केला जातो, याचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. सोशल मीडियावरील आपल्या अकाउंटचं व्यवस्थापन हा लोकप्रतिनिधींसाठी एक कार्यालयीन भाग बनला आहे. टाळेबंदीच्या काळात मतदारांशी थेट संपर्क तुटल्याने त्यांच्यासाठी सोशल मीडिया हा एकमेव आधार बनला होता, त्यामुळे या महिला आमदारांकडून सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला. 

मतदारसंघातील कामाविषयीच्या मजकूराबाबत उदासीनता 

सन २०१९ च्या निवडणुकीत २४ महिला आमदार विधिमंडळात निवडून गेल्या आहेत. या आमदार महिला सोशल मीडियावरही उपस्थित आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्याकडून मतदारसंघातील स्थिती, समस्या समजून घेण्यासाठी फारशी मदत होत नसल्याचे 'संपर्क'च्या अभ्यासातून दिसून आले आहे. अनेक आमदार महिलांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिनविशेष, महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या तसेच राजकीय व्यक्तींच्या वाढदिवसाच्या पोस्ट यांची संख्या सर्वाधिक म्हणजे ७१ टक्के एवढी आहे. तर, मतदारसंघातील कामांविषयीचा मजकूर ४.३१ टक्के इतकाच दिसतो. 

कोरोना काळातील पोस्टचे विश्लेषण

'संपर्क'ने २०२० मध्ये कोरोनाच्या काळात सर्व महिला आमदारांच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध झालेल्या पोस्टच्या नोंदी ठेवल्या तसेच त्याचे वर्गीकरण केले. यामध्ये महिला आणि बालकांसंबंधीचा मजकूर हा २ टक्क्यांहून कमी तर त्याही पेक्षा कमी म्हणजे दीड टक्के मजकूर हा शिक्षणाविषयी आढळला. कोरोनाच्या काळात रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर होता, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या तर हातावर पोट असलेल्या मजूर वर्गाचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले होते. मात्र, महिला आमदारांच्या सोशल मीडियावर रोजगारासंबंधीच्या पोस्टचे प्रमाण केवळ ०.०७२ टक्के होतं. तर स्थलांतरितांच्या प्रश्नांवरील पोस्टची संख्या ०.२२ टक्के इतकी आहे. या काळात महिला आमदारांनी अनेक कल्याणकारी कामं केली, यासंबंधीच्या पोस्ट ४.३१ टक्के होत्या. 

'या' आमदार महिला आघाडीवर

विधानसभेतील कामकाजाविषयी सोशल मीडियावरुन माहिती देणाऱ्यांमध्ये आमदार सुलभा खोडके या आघाडीवर आहेत त्यांच्यानंतर प्रतिभा धानोरकर यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी बालकांविषयीच्या सर्वाधिक पोस्ट केल्या आहेत. तर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षणविषयक सर्वाधिक पोस्ट केल्या आहेत. संबंधित मंत्रालये सांभाळत असल्याने हे होणं सहाजिकचं आहे. 

महिलांबाबतच्या सर्वाधिक पोस्ट 'या' आमदाराच्या 

सरोज अहिरे या विधिमंडळाच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष असतानाही त्यांच्या पेजवर महिला आणि बालकांविषयीचा मजकूर हा नगण्य होता. दरम्यान, महिलांबाबतच्या सर्वाधिक पोस्ट या नमिता मुंदडा आणि त्यानंतर सीमा हिरे यांनी केल्या आहेत. तर शेतीविषयक सर्वाधिक पोस्ट या नमिता मुंदडा यांनी त्यानंतर मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केल्या आहेत. 

लाखांच्यावर फॉलोवर्समध्ये या महिला आमदारांच वर्चस्व

तसेच पेज लाईक्स आणि सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या महिला आमदारांच्या यादीत डॉ. भारती लव्हेकर, श्वेता महाले आणि प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. या तिन्ही महिला आमदारांचे फॉलोवर्स हे १ लाखांच्यावर आहेत. वर्सोवा मतदारसंघातील आमदार असलेल्या डॉ. भारती  लव्हेकर यांच्या पेजला ३ लाखांहून अधिक लाईक्स आहेत आणि फॉलोवर्सही आहेत.