शेतीतील प्रेरणादायी सीमोल्लंघन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे - पारंपरिक शेतीला कष्टाबरोबरच तंत्रज्ञानाची आणि आधुनिक साधनांची जोड दिली, तर ती नक्कीच फायद्याची होते, हे त्या तिघींनी सिद्ध करून दाखवलेच; शिवाय गावातील इतरांचीही शेती समृद्ध केली. गेली शेतीतील महिलांचा सहभाग किती परिणामकारक ठरू शकतो, याचा आदर्श विमल आचारी, अंजली वामन आणि अनिता माळगे यांच्या रूपाने बघायला मिळतो. तिघीही ‘तनिष्का’ सदस्या आहेत. त्यांचे कृषिक्षेत्रातील ‘सीमोल्लंघन’ इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.  

पुणे - पारंपरिक शेतीला कष्टाबरोबरच तंत्रज्ञानाची आणि आधुनिक साधनांची जोड दिली, तर ती नक्कीच फायद्याची होते, हे त्या तिघींनी सिद्ध करून दाखवलेच; शिवाय गावातील इतरांचीही शेती समृद्ध केली. गेली शेतीतील महिलांचा सहभाग किती परिणामकारक ठरू शकतो, याचा आदर्श विमल आचारी, अंजली वामन आणि अनिता माळगे यांच्या रूपाने बघायला मिळतो. तिघीही ‘तनिष्का’ सदस्या आहेत. त्यांचे कृषिक्षेत्रातील ‘सीमोल्लंघन’ इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.  

आधुनिक तंत्राने समृद्ध शेती 
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्‍यातील चाकोरेच्या विमल आचारींनी स्वतःची शेती आमूलाग्र बदलली. आदिवासी भागात शेती पारंपरिक पद्धतीने करीत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने चाकोरे गाव विकासासाठी दत्तक घेतले. विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने विमलताईंना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या कष्टाला आधुनिक तंत्राची, साधनांची जोड मिळाली. नाचणी, लसूण, वरई, पेरू, कांदा, केशर आंबा यांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती लावताना शेती सेंद्रिय करण्यावर त्या भर देत आहेत. देशी गायींची जोपासना, कुक्कुटपालन, शेळीपालनाची जोड दिल्यामुळे शेती किफायतशीर न झाली तर आश्‍चर्य!  उसामध्ये बटाट्याचे अंतरपीक घेऊन उत्पन्नाचा विक्रम केला. वैयक्तिक प्रगती साधताना गावाचे नेतृत्वही विमलताईंनी केले. कुऱ्हाडबंदी, चराईबंदीबरोबरच इतरांची शेतीही किफायतशीर व्हावी म्हणून त्या थेट शेतावरच मार्गदर्शनाचे उपक्रम आखतात. महिलांचे बचत गट बांधून त्यांना उत्पन्नाचे मार्ग सुचवतात. त्यांच्या कष्टांची दखल बारामतीच्या अप्पासाहेब कृषी प्रतिष्ठानने पुरस्काराचा चांदीचा कोयता देऊन घेतली. एम. एस. स्वामीनाथन फाउंडेशननेही त्यांना गौरवले आहे. 
 
शेतकरी महिलांची सहकारी संस्था 
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधतात. त्यात महिला शेतकरी म्हणून त्यांच्याशी बोलण्याचा मान सोलापूर जिल्ह्यातील बोरामणीच्या अनिता माळगे यांना सर्वप्रथम मिळाला. नुकताच केंद्र सरकारचा (आयसीआर) प्रतिष्ठेचा महिला किसान पुरस्कार त्यांना मिळालाय. अनिता यांच्या प्रयत्नांतून बोरामणीत ४०० स्वच्छतागृहे उभी राहिली. अनिता आणि त्यांच्या पतीने, योगेश यांनी यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुरू केली. त्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला मुंबईत पाठविण्यात येतो. ‘आमचा गाव, आमचा विकास’ या योजनेत अनितांची निवड झाली. यशदामध्ये त्यांना प्रशिक्षण मिळाले. आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलून ८० लाखांचा विकास आराखडा त्यांनी यशस्वीपणे आखला. 

सामाजिक कामाच्या ओढीतून त्यांनी राज्यातील महिला शेतकऱ्यांची पहिली सहकारी संस्था सुरू झाली. ‘नाबार्ड’ने अनिता यांच्यावर शेतकरी महिलांचे गट करून त्यांना व्यवसायासाठी कर्ज देण्याचे काम विश्वासाने सोपवले. त्यातून तीस, चाळीस गावांत अनिता यांनी असे गट उभारले आहेत. गुलाबजल, मसाले, चटण्या, हुरडा केंद्र, बांगड्यांची फिरती दुकाने सुरू झाली. अनिता यांचे काम आता व्यक्ती नाही, तर संस्थेसारखे सुरू आहे. 

ठिबक सिंचनाचा वापर ८० टक्के शेतात
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍यातील काळवाडीच्या सरपंच असलेल्या अंजली वामन यांचा प्रवास गृहिणी ते शेतकरी असा आहे. अंजली यांनी शेतीत ठिबक सिंचनाचा, मल्चिंग पेपरचा प्रभावी वापर केला. उपलब्ध साधनसामग्रीतून उत्पादन वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती जसजशी इतरांना कळायला लागली, तसा त्यांचा सल्ला घेऊन गावातील ८० टक्के शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन यंत्रणा बसवली. काळवाडीतील शेतकरी आता स्मार्ट शेती करतात. ग्रामस्थांची शेतीतील समज आणि एकोपा पाहून राज्य सरकारने ‘स्मार्ट व्हिलेज’ योजनेत गावाचा समावेश केला आहे. अंजलींनी केळी पिकवण्याचे केंद्र सुरू केले, त्याचा फायदा तीनशे शेतकऱ्यांना आत्तापर्यंत झाला आहे. साहजिकच गावाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले.

Web Title: women's participation in agriculture can be effective