सत्कारापेक्षा कामे महत्त्वाची; मुख्यमंत्र्यांची नव्या मंत्र्यांना तंबी​

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

पावसाळी अधिवेशनाला गेल्या सोमवारपासून (ता. १७) सुरवात झाली. अधिवेशन सुरू होण्याच्या केवळ एक दिवस आधी १० नव्या मंत्र्यांचा शपथविधी उरकण्यात आला.

मुंबई : विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्यातच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनासाठी नव्या मंत्र्यांनी अधिकाधिक वेळ द्यावा, अधिकाधिक अभ्यास करावा, यासाठी नव्या मंत्र्यांनी सत्कार सोहळ्यात अडकू नये, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांना दिले आहेत.

पावसाळी अधिवेशनाला गेल्या सोमवारपासून (ता. १७) सुरवात झाली. अधिवेशन सुरू होण्याच्या केवळ एक दिवस आधी १० नव्या मंत्र्यांचा शपथविधी उरकण्यात आला. यामुळे नव्या मंत्र्यांना वेळ न मिळाल्याने आपल्या नव्या खात्याचा अभ्यास करता आला नाही. आपल्या नव्या खात्याचा अभ्यास करण्यासाठी जो काही वेळ मिळेल, तो वेळ नव्या मंत्र्यांनी आपलं खात समजून घेण्यासाठी वापरावा. तसेच अधिवेशनात आपल्या अभ्यासपूर्ण कामाने वेगळी छाप सोडावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मंत्रिमंडळ विस्तारात १० नव्या मंत्र्यांनी शपथ घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या मतदार संघात मंत्री महोदयांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मात्र, नव्या खात्याचा अभ्यास आणि मुख्यमंत्र्यांची तंबी यामुळे नवे मंत्री सत्कार सोहळ्यासाठी आपल्या मतदार संघात फिरकलेच नाहीत. नव्या मंत्र्यांना मिळालेलं मंत्रिपद हे केवळ दोन महिन्यांसाठी असलं तरी आपल्या कामातून मुख्यमंत्र्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न नवे मंत्री करत आहेत.

नव्या मंत्र्यांकडून पक्षाला फार अपेक्षा आहेत. राज्यात दुष्काळ असताना नव्या मंत्र्यांनी मतदारसंघात जाऊन सत्कार स्वीकारणे पक्षाला अपेक्षित नाही. वेळ कमी असून कामे महत्वाची आहेत. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा सल्ला दिल्याचे कळते.
- गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work is more important than honour says CM Fadnavis