'जगातील सर्वांत मोठी ग्रीन आर्मी उभारणार '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

महाबळेश्‍वर - वन विभागाने ग्रीन आर्मीची संकल्पना मांडली. 25 लाख सदस्य केले. लवकरच एक कोटी सदस्यसंख्या करून ही जगातील सर्वांत मोठी ग्रीन आर्मी असेल. महाराष्ट्र देशात पायोनिअर असेल, असे प्रतिपादन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. 

महाबळेश्‍वर - वन विभागाने ग्रीन आर्मीची संकल्पना मांडली. 25 लाख सदस्य केले. लवकरच एक कोटी सदस्यसंख्या करून ही जगातील सर्वांत मोठी ग्रीन आर्मी असेल. महाराष्ट्र देशात पायोनिअर असेल, असे प्रतिपादन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. 

सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गुरेघर (ता. महाबळेश्‍वर) येथे उभारण्यात आलेल्या (कै.) उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाचे उद्‌घाटन श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार मकरंद पाटील, सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य संरक्षक अ. रा. चढ्ढा, अप्पर प्रधान संरक्षक साईप्रकाश, मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे, माजी खासदार गजानन बाबर, विक्रम पावसकर, नीता केळकर, भरत पाटील, नगरसेवक विजय काटवटे, धनंजय जांभळे आदी उपस्थित होते. 

श्री. मुनगंटीवार म्हणाले, ""हे उद्यान उभे राहावे, यासाठी अनेकांचे हातभार लागले आहेत. मनापासून पुढच्या पिढीला ज्ञानाचा वारसा देण्याची भावना यामागे आहे. सृष्टीचे काम हे ईश्वरीय काम आहे. निसर्गचक्राच्या विरोधात मनुष्य वागत आहे. या उद्यानात आल्यावर सर्व चिंता तर दूर होतात. जनतेच्या सहकार्याशिवाय वन विभाग पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच ग्रीन आर्मीची संकल्पना वन विभागाने मांडली.'' 

श्री. खारगे म्हणाले, ""महाबळेश्‍वरच्या वैभवात भर टाकणारे हे उद्यान आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची दोन-दोन उद्याने आहेत. अशी उद्याने उभी करणारे हे देशातील पहिले राज्य आहे. दुर्मिळ जातींचे संवर्धन या उद्यानाच्या माध्यमातून केले जाईल. विद्यार्थ्यांसाठी अशी उद्याने पर्वणी आहेत. हरित महाराष्ट्राचे स्वप्न वन विभाग लवकरच पूर्ण करेल.'' 

मॅप्रोचे संचालक मयूर व्होरा, संशोधक जी. जी. गोगटे, विजयकुमार भिलारे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हणमंत धुमाळ यांनी केले. 

अर्थमंत्र्यांचा कार्यक्रम वीजचोरीतून 

जैवविविधता पार्कच्या या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी विद्युत खांबावर चक्क आकडा टाकून वीज घेण्यात आली होती. अर्थ व वन खात्याच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमासाठीच करण्यात आलेली ही "चोरी' प्रसारमाध्यमांनी पत्रकार परिषदेत श्री. मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिली. ते थोडे खजिल झाले; परंतु स्वत:ला सावरत संबंधित प्रकारची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, असा आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनास दिला. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या व्यासपीठाशेजारीच असलेल्या विजेच्या खांबावर आकडा टाकून वीज घेण्यात आली होती. ही बाब कार्यक्रम संपल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी श्री. मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ते संतप्त झाले. कार्यक्रमापूर्वीच ही बाब माझ्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते, असे ते म्हणाले आणि लगेचच तेथून काढता पाय घेतला. तत्पूर्वी, तुरीला हमीभाव देण्यास आम्ही बांधिल आहोत. राज्य सरकार याबाबत निर्णय घेणार आहे. 

Web Title: The world's largest green army will be set up