...म्हणे तानाजींचे टोपणनाव 'सिंह' होते!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

'आयसीएसई' बोर्डाच्या चौथ्या इयत्तेच्या पुस्तकामध्ये कोंढाणा किल्ला स्वराज्याला पुन्हा जिंकून देणारे तानाजी मालुसरे यांच्या इतिहासाशीच खेळ करण्यात आला आहे. तानाजी यांचे टोपणनाव 'सिंह' होते म्हणून कोंढाणा किल्ल्याचे 'सिंहगड' असे नामकरण केल्याचा अजब जावईशोध लावण्यात आला आहे.

'आयसीएसई' बोर्डाकडून सिंहगडाच्या नामकरणावर जावईशोध

वसई/विरार - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी साम्राज्याच्या इतिहासाची मोडतोड मुघल, इंग्रजांनी केली होती. ते परकीय असले तरी आज स्वकियांकडूनच नव्या पिढीला चुकीचा इतिहास शिकविण्यात येत आहे. 'आयसीएसई' बोर्डाच्या चौथ्या इयत्तेच्या पुस्तकामध्ये कोंढाणा किल्ला स्वराज्याला पुन्हा जिंकून देणारे तानाजी मालुसरे यांच्या इतिहासाशीच खेळ करण्यात आला आहे. तानाजी यांचे टोपणनाव 'सिंह' होते म्हणून कोंढाणा किल्ल्याचे 'सिंहगड' असे नामकरण केल्याचा अजब जावईशोध लावण्यात आला आहे. ही बाब शिवसैनिकांना समजल्यानंतर त्यांनी विरार येथील नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये धाव घेऊन याचा निषेध केला आहे.

'आयसीएसई' बोर्डाच्या चौथीच्या पाठपुस्तकात तानाजी मालुसरे यांच्याशी निगडित इतिहासच धड्याच्या लेखिका मंजूषा स्वामी यांनी बदलून टाकला आहे. त्यांनी या धड्यामध्ये 'मालुसरे यांचे टोपणनाव सिंह होते. कोंढाण्याच्या लढाईत तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. म्हणून कोंढाण्याचे नाव सिंहगड असे ठेवले', असा इतिहास नवीन पिढीच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.
ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर शिवसेना जिल्हा उपप्रमुख दिलीप पिंपळे यांनी नॅशनल इंग्लिश स्कूलकडे याबाबत विचारणा केली असता, ही पुस्तके दिल्लीच्या न्यू सरस्वती हाऊस (इंडिया प्रा. लिमिटेड) यांनी प्रकाशित केली असल्याचे सांगण्यात आले. पुस्तकाच्या 130 प्रती कुरिअरने मागविल्या होत्या. पुस्तकातील पान क्र. 61 वर कोंढाणा किल्ल्याबद्दल माहिती देण्यात आली होती. ही चूक दुरुस्त करण्यात येत असून, या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत असल्याचे शाळेचे संचालक दीपक कुलकर्णी यांनी सांगितले.

कारवाई न केल्यास आंदोलन
शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांचा चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून अशा इतिहासकारांना आम्ही धडा शिकवू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दिलीप पिंपळे यांनी या वेळी दिला.

'आयसीएसई'ची पुस्तके महाराष्ट्रात तयार होत नाहीत. ही पुस्तके दिल्लीवरून मागविण्यात येतात. आमच्या शाळेनेही पुस्तके मागवली. या संदर्भातील चूक लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी चुकीची दुरुस्ती करून चिकटपट्टी लावण्यात आली आहे. चुकीबाबतची माहिती 'न्यू सरस्वती हाउस'ला कळविण्यात आली आहे.
- दीपक कुलकर्णी, विश्वस्त, संचालक नॅशनल इंग्लिश स्कूल

महाराष्ट्रात आयसीएसई, सीबीएससी आणि इतर बोर्डाच्या शाळाही सुरू आहेत. त्या ठिकाणी मराठ्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने छापला जात असेल, तर त्यात राज्य सरकारने लक्ष घालून त्याची चौकशी करायला हवी; अन्यथा मुघल आणि इंग्रजांनी लिहिलेल्या चुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती नव्या पिढीला वाचायला मिळेल.
- डॉ. दत्त राऊत, इतिहास अभ्यासक

Web Title: Wrong interpretation of Maharashtra's history in ICSE Fourth standard book