
'काँग्रेस म्हणजेच भारत आणि भारतीयत्व म्हणजेच काँग्रेसचा विचार'
मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यावरुन काँग्रेसवर टीका-टिप्पणी होत आहे. पक्षाच्या बैठकांमधून पराभवाचे चिंतनही करण्यात आले. काँग्रेसच्या पराभवाबाबत राज्याच्या महिला व बालविकाम मंत्री तथा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाष्य केले आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, गांधी परिवार राजकारणाच्या केंद्रस्थानी नसला की भाजपचं काम सोपं होणार आहे. सगळी मांडणी त्या दृष्टीकोनातून सुरु आहे. आजही काँग्रेस (Congress Party) देशातील एक मजबूत विरोधी पक्ष आहे. काँग्रेसच्या विधानसभा मधल्या जागा आणि शक्ती सातत्याने वाढतेय. (Yashomati Thakur Says Congress Means India And Indianness Means Congress Thought)
हेही वाचा: G23 चे नेते गुलाम नबी आझाद यांचं काँग्रेस अध्यक्षपदाबाबत मोठं वक्तव्य
काही ठराविक निवडणूक निकालांच विश्लेषण केले, तर काँग्रेसच्या जागा अकार्यक्षमतेमुळे नव्हे, तर द्वेषाच्या राजकारणाच्या नव्या पेरणीमुळे घटल्या आहेत. काँग्रेसच्या घटत्या जागा काँग्रेसच्या चिंतेचा विषय असण्याबरोबरच भारताच्या बदलत्या सामाजिक, राजकीय, धार्मिक ध्रुवीकरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे, अशा त्या म्हणाल्या. काँग्रेस आपल्या तत्त्वांपासून हलत नाही. निवडणुकांमधले पराभव हे यशाच मानक नाहीयं. लढणं, उभं राहणं, तडजोड न करणं हे यशाचं मानक आहे. देशातील अनेक प्रादेशिक-राष्ट्रीय पक्षांनी अनैसर्गिक तडजोडी केल्या, पण काँग्रेस आणि काँग्रेसचे काही जुने मित्रपक्ष सदैव संघ परिवाराच्या विरोधात ठाम राहिले. त्याची किंमत निवडणुकीतील जागाच काय प्राण देऊनही आम्ही चुकवू. आम्ही निर्भय आहोत, निडर आहोत, ठाम आहोत. सुदृढ भारतासाठी आम्हीच पर्याय आहोत, अशा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: 'नरेंद्र मोदींनंतर भाजप भारतात टिकणार नाही, पण काँग्रेस कायम राहील'
काँग्रेस म्हणजेच भारत (India) आणि भारतीयत्व म्हणजेच काँग्रेसचा विचार. द्वेषाचं राजकारण जोपर्यंत आपल्या दारापर्यंत येत नाही, तोपर्यंत ते फार आकर्षक वाटतं. लक्षात ठेवा, अशा राजकारणाचे काही दिवस-वर्षे असतात. मात्र सौहार्द-प्रेम, लोकशाही, भेदभाव विरहित समाज, माणुसकी ही शाश्वत कल्पना आहे. ती कधीच मरु शकत नाही. काँग्रेस त्या कल्पनेचा अविष्कार आहे. समाजातील बुद्धीवंतांनी खोट्या प्रचाराला बळी पडून तत्कालिक विश्लेषण करु नये. दूरदृष्टीने पाहा, काँग्रेसचं असणं आणि गांधीचं राजकारणात असणं याचं महत्त्व तुम्हाला पटेल, असे आवाहन त्यांनी बुद्धीवंतांना केले.
Web Title: Yashomati Thakur Says Congress Means India And Indianness Means Congress Thought
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..