यिन मंत्रिमंडळाची विधिमंडळाला भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 मार्च 2017

विधानसभा, विधान परिषदेच्या कामकाजाचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

विधानसभा, विधान परिषदेच्या कामकाजाचा घेतला प्रत्यक्ष अनुभव
मुंबई - समाजकारणाची बांधिलकी घेऊन राजकीय कार्यपद्धतीत आधुनिक बदल घडवण्याच्या हेतूने प्रेरित "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स (यिन) च्या युवा मंत्रिमंडळाने आज विधिमंडळाला भेट देऊन अर्थसंकल्पी कामकाजाचा अभ्यास केला. यिन मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्री सदस्यांनी विधानसभा व विधान परिषद कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. विधानसभेत विविध विषयांवरील लक्षवेधी सूचना व अर्थसंकल्पावरील चर्चेच्या कामकाजाने यिन मंत्रिमंडळ प्रभावित झाले,
तर, विधान परिषद बरखास्त करण्यास विरोध करणाऱ्या वादळी चर्चेचा अनुभव "यिनर्स'नी घेतला.

विधानसभा अध्यक्षांची भेट व मार्गदर्शन
दरम्यान, यिनच्या मंत्रिमंडळाने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेतली. अध्यक्षांच्या बैठक हॉलमध्ये दिलखुलासपणे विधानसभा अध्यक्षांनी यिन मंत्रिमंडळाची माहिती घेत मार्गदर्शन केले. सर्व युवावर्गाला राजकीय जीवनात करिअर करतानाच लोकसेवा व उत्तम, पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माण करण्याची योग्य संधी देणारा हा कालखंड असल्याचे बागडे म्हणाले. राज्यभरात "सकाळ' समूहाच्या कल्पकतेतून युवा व महाविद्यालयीन युवकांत पारदर्शक राजकीय चळवळ उभी करण्याचा हा अभिनव प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. यिनचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून यिन मंत्रिमंडळाच्या कामकाजाबाबत विधानसभा अध्यक्षांनी माहिती घेतली.

ग्रंथालयाची पाहणी
यिन मंत्रिमंडळाने विधानभवनातील ग्रंथालयाची पाहणी केली. मुख्य ग्रंथपाल बाबा वाघमारे यांनी ग्रंथालयाची निर्मिती, पद्धती, मागील शंभरहून अधिक वर्षांच्या कामकाजाचे शब्दश: संदर्भांचे केलेले जतन याबाबतची माहिती दिली.

युवा आमदारांशी संवाद
यिनच्या मंत्रिमंडळाने या वेळी काही युवा आमदारांची भेट घेतली. आमदार हेमंत पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, तर विधान परिषदेतील आमदार निरंजन डावखरे, अमर राजूरकर व विद्या चव्हाण यांच्याशी "यिन'ने संवाद साधत विचारांची देवाणघेवाण केली. आमदार हेमंत पाटील यांनी "यिन'च्या चळवळीने प्रभावित झालो असल्याची भावना व्यक्त केली, तर ज्ञानराज चौगुले यांनी आपण एका शाळेत प्रयोगशाळा सहायक होतो; मात्र जनतेसोबतचा संपर्क व प्रामाणिकपणामुळे सलग दुसऱ्यांदा आमदार झाल्याचे सांगितले. आमदार निरंजन डावखरे यांनी पक्षीय मतभेद व टोकाचा विरोध न करता विकासाची दिशा घेऊन राजकीय व्यक्तिमत्त्व घडवल्यास जनता स्वीकारते, असा सल्ला त्यांनी दिला.

Web Title: yin mantrimandal visit to vidhimandal