"तुम्ही आदिवासींमध्ये फूट पाडत आहात"; फडणवीसांचा शरद पवारांना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar_Devendra Fadnvis
"तुम्ही आदिवासींमध्ये फूट पाडत आहात"; फडणवीसांचा शरद पवारांना टोला

"तुम्ही आदिवासींमध्ये फूट पाडत आहात"; फडणवीसांचा पवारांना टोला

मुंबई : आदिवासी समाजात फूट पाडणारी तुमची भाषा आणि विधानं आहेत, अशा शब्दांत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदींच्या एका व्हिडिओवर दिलेल्या प्रतिक्रियेवरुन फडणवीसांना पवारांवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.

हेही वाचा: पंजाब, राजस्थानप्रमाणं राज्यात करा इंधन कर कपात; काँग्रेसची मागणी

फडणवीस ट्विट करत म्हणाले, तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांना तथ्ये आणि नेमकी माहिती असायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जनजाती आणि आदिवासी हे शब्द वापरले आहेत. तुम्ही दावा केल्याप्रमाणं त्यांनी शब्द वापरलेले नाहीत.

त्यामुळं तुमची भाषा आणि विधानं ही आदिवासी समाजातील लोकांमध्ये फूट पाडणारी आहेत. तसेच तुम्ही ज्या लोकांसोबत व्यासपीठावर आहात त्यांची पार्श्वभूमी तुम्ही तपासायला हवी होती, त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, हे देखील तपासायला हवं होतं, असंही दुसऱ्या एका ट्विटमध्ये फडवणवीस यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्याला शरद पवार यांनी गुरुवारी संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधील आदिवासी संमेलनात केलेल्या भाषणाचा उल्लेख केला. पवार म्हणाले, "आज देशाची सूत्रे भाजपकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण मला आश्चर्य वाटलं, तिथे कुठेही त्यांनी आदिवासी हा शब्द वापरला नाही. त्याऐवजी वनवासी असा शब्द वापरण्यात आला. वनवासी हा शब्द आदिवासींना मंजूर नाही."

loading image
go to top