
तात्या लांडगे
सोलापूर : राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची १३ हजार ५६० पदे रिक्त असून, गणेशोत्सवानंतर पदभरतीला सुरवात होणार आहे. सध्या रिक्त पदांची बिंदुनामावली पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्याच्या ‘प्रशिक्षण व खास पथके’च्या अपर पोलिस महासंचालकांनी रिक्त पदांची माहिती गृह विभागाला कळविली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरवात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिस भरतीचा पहिला टप्पा मैदानाचा असतो. सध्या पावसाळा सुरू असल्याने मैदानी चाचणी घेणे अशक्य आहे. दुसरीकडे, राज्यात २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून, त्यासाठी राज्यभर पोलिस अधिकारी व अंमलदारांना बंदोबस्ताची ड्यूटी असते. त्यामुळे गणेशोत्सवानंतर म्हणजेच सप्टेंबरअखेर उमेदवारांकडून पोलिस भरतीसाठी अर्ज मागविले जातील. त्यानंतर ऑक्टोबरपासून मैदानी चाचणीला सुरवात होईल.
उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून, एकाच पदासाठी उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकणार नाही. एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केले असतील तर एकच अर्ज पात्र ठरेल. प्रत्येक अर्जाचे शुल्क एक हजार रुपयांपर्यंत असणार आहे. पावसाळ्यानंतर पोलिस भरतीला सुरवात होणार असल्याने गावागावांतील तरुण-तरुणी पोलिस भरतीची तयारी करत आहेत.
रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम टप्प्यात
राज्यातील गृह विभागाकडील दहा हजार १८४ पोलिसांची (पोलिस शिपाई, चालक शिपाई) पदे रिक्त आहेत. याशिवाय बँड्समन, राज्य राखीव पोलिस बल अशीही दीड हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने रिक्त पदांची माहिती गृह विभागाला दिली आहे. आता रिक्त पदांची बिंदुनामावली पडताळणी सुरू आहे. बिंदुनामावली सप्टेंबरमध्ये पूर्ण होऊन गृह विभागाच्या मंजुरीनंतर पदभरतीला सुरवात होणार आहे.
मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांत एकाचवेळी ‘लेखी’
राज्यात दरवर्षी सरासरी एकूण पदांपैकी पाच टक्के पोलिस अंमलदार सेवानिवृत्त होतात. विभागीय चौकशीअंती बडतर्फ झालेले, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील चार ते पाच टक्के असते. याअनुषंगाने ऑक्टोबरमध्ये साडेतेरा हजारांवर पोलिसांच्या भरतीस सुरवात होणार आहे. मुंबई वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील उमेदवारांची राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
रिक्त पदांचा गोषवारा
नियोजित पोलिस भरतीतील रिक्त पदे
११,७८०
पदोन्नती, हजर न झालेली अंदाजे पदे
१,८७०
एकूण रिक्त पदे
१३,६५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.