पतंग उडवताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

जयेश सुर्यवंशी
मंगळवार, 15 जानेवारी 2019

पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जेलरोड भागात घडली.

जेलरोड : पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जेलरोड भागात घडली. ऐन मकर संक्रातीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (ता. 14)  मकरसंक्रांतनिमित्त जेलरोड भागातील मोरे मळा बालाजीनगर भागात राहणारा युवक सुफियान निजाम कुरेशी (वय16) हा जेलरोड येथील एंजल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी होता. तो आज दुपारी मित्रांसोबत प्रगतीनगरला बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी तीनच्या सुमारास पतंग उडवत होता. यादरम्यान त्याचा तोल गेल्याने तो जमिनीवर पडला. या घटनेत सुफियान याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे परिसरात उपस्थित नागरिकांनी त्याला उपचारासाठी नाशिक रोड येथील जयराम रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सुफियान याचा सायंकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

रुग्णालयात सुफियानच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या घटनेची नाशिक रोड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिस करीत आहेत.

Web Title: Youth Collapsed from Building and Died