युवक काँग्रेसचा 'वेकअप महाराष्ट्र'चा नारा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

युवक काँग्रेसने " वेकअप महाराष्ट्र... उद्यासाठी आत्ता " हे अभिनव अभियान राबविण्याचे ठरविले असल्याची माहिती, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

मुंबई: आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने  खास युवकांसाठी देशात पहिल्यांदाच स्वतंत्र युवक जाहिरनामा तयार करण्याचे ठरविले आहे. यानिमित्ताने राज्यातील ४ ते ५ कोटी युवकांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र काय आहे, हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊन युवक काँग्रेसने " वेकअप महाराष्ट्र... उद्यासाठी आत्ता " हे अभिनव अभियान राबविण्याचे ठरविले असल्याची माहिती, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

एकीकडे 2020 मध्ये भारत महासत्ता होण्याची स्वप्ने दाखविली जात असताना दुसरीकडे देशात सध्या लोकशाहीविरोधी वातावरण तयार झाले आहे. भारताची परिस्थिती पुन्हा पारतंत्र्याच्या दिशेने सुरु आहे की काय असे देशातील वातावरण आहे.  भारत हा युवकांचा देश आहे, ही वस्तुस्थिती असली तरी देशातील कोट्यवधी युवक मात्र फक्त नोकरी नसल्यामुळे बेरोजगार म्हणून जीवन जगत असल्याचे वास्तवही नाकारून चालणार नाही. भाजपा सरकारच्या राजवटीत बेरोजगारीचा दर सर्वोच्च स्थानी पोहचला आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकार देशातील लाखो युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने युवकांची चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने खास युवकांसाठीच युवक जाहिरनामा तयार करण्याचे ठरविले आहे. 

उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी आत्ताच युवकांनी जागे होण्याची नितांत गरज आहे. याच हेतूने १८ ते २५ या वयोगटातील राज्यातील युवकांशी चर्चा, बैठका, चर्चासत्र, थेट संवाद, युवक मेळावे, प्रश्नोत्तरे , वेगवेगळ्या स्पर्धा आणि युवकांना आवडतील अशी अनेक उपक्रमांद्वारे महाराष्ट्रातील ४ ते ५ कोटी युवकांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जाणून घेण्याचा युवक काँग्रेसचा प्रयत्न आहे. या निमित्ताने युवकांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सवांद साधतानाच युवकांचे लोकशाही व्यवस्थेत जास्तीत-जास्त सहभाग कसा वाढवता येईल, याबाबतही आम्ही ठोस आराखडा तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत, अशीही माहिती यावेळी सत्यजीत तांबे यांनी दिली. 

"वेकअप महाराष्ट्र... उद्यासाठी आत्ता " या अभियानाला आजपासून सुरुवात झाली. मुंबईतील गांधी भवन येथे यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस सहसचिव तथा भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, "वेकअप महाराष्ट्र ... उद्यासाठी आत्ता "  या प्रकल्पाच्या प्रभारी रीषिका राका , विश्वजीत हप्पे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Congress launch new Program with slogan 'Wakeup Maharashtra'