स्वयंपूर्ण गावासाठी युवकांचा पुढाकार ! 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी 'इतके' आहेत युवक उमेदवार

तात्या लांडगे
Sunday, 27 December 2020

युवकांच्या नजरेतून...

  • कोरोनामुळे हाताला अपेक्षित काम नाही; सध्या गावातच वास्तव्य
  • जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या तुलनेत ग्रामपंचायतींना मिळतो थेट निधी
  • गावांमधील स्थलांतर आणि रोजगारासाठीची भटकंती थांबविण्यासाठी युवकांची धडपड
  • रोजगार निर्माण करुन शैक्षणिक व सामाजिक विकासातून गाव स्वयंपूर्ण बनविण्याची महत्वकांक्षा

सोलापूर : लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा टप्पा पार पडत आहे. राज्यातील 27 हजार 881 ग्रामपंचायतींपैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून एक लाख 42 हजार 281 सदस्य निवडले जाणार आहेत. 23 डिसेंबरपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 34 जिल्ह्यांमधून दोन लाखांपर्यंत ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यात 21 ते 32 या वयोगटातील युवक- युवतींची संख्या दीड लाखांपर्यंत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीची स्थिती
एकूण ग्रामपंचायती
27,881
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती
12,234
ग्रामपंचायतींची सदस्य संख्या
1,42,281
आतापर्यंतचे उमेदवारी अर्ज
1,91,239
अंदाजित युवक उमेदवार
1,48,000

 

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजाराची शक्‍यता वर्तवित राज्य सरकारने निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्‍वभूमीवर यंदा सरपंच आरक्षण बदलून आपल्यालाच गावचा कारभार हाकण्याची संधी मिळेल, अशी युवकांना आशा लागली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक युवक गावातच राहू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर नाशिक, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, नगर यासह अन्य जिल्ह्यांमध्ये इच्छूकांमध्ये युवकांचीच संख्या मोठी आहे. एक लाख 42 हजार ग्रामपंचायत सदस्यांसाठी सुमारे तीन लाखांपर्यंत अर्ज अपेक्षित आहेत. दरम्यान, आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून गावांच्या विकासासाठी मिळणारा निधी आता 14 व्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतींना मिळू लागला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्या आता वैयक्‍तिक लाभांच्या योजनांपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. गाव स्वंयपूर्ण करुन आदर्श मॉडेल बनावे या हेतूने युवक ग्रामपंचायत निवडणुकीतून पुढे येऊ लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 25 ते 27 डिसेंबरला सार्वजनिक सुट्ट्या असून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 28 ते 30 डिसेंबरपर्यंतच मुदत आहे. 

युवकांच्या नजरेतून...

  • कोरोनामुळे हाताला अपेक्षित काम नाही; सध्या गावातच वास्तव्य
  • जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या तुलनेत ग्रामपंचायतींना मिळतो थेट निधी
  • गावांमधील स्थलांतर आणि रोजगारासाठीची भटकंती थांबविण्यासाठी युवकांची धडपड
  • रोजगार निर्माण करुन शैक्षणिक व सामाजिक विकासातून गाव स्वयंपूर्ण बनविण्याची महत्वकांक्षा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth inspire for self-sufficient village! 70% youth candidates for 14 thousand 234 gram panchayats