१०वी झालेल्या तरुणांना गावातच मिळणार रोजगार! ५११ गावांमध्ये कौशल्य विकास केंद्रे; ‘या’ कोर्सेसचे मिळणार मोफत प्रशिक्षण

ग्रामीण भागातील तरुण-तरुणींचे स्थलांतर रोखून त्यांना गावातच उद्योग तथा रोजगाराची संधी मिळावी या हेतूने ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रातील ५११ गावांमध्ये अशी केंद्रे उभारली गेली आहेत.
pune student education personality Development college effectiv communication skills
pune student education personality Development college effectiv communication skillsSakal

सोलापूर : ग्रामीण भागातील तरुण-तरुणींचे स्थलांतर रोखून त्यांना गावातच उद्योग तथा रोजगाराची संधी मिळावी या हेतूने ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रातील ५११ गावांमध्ये अशी केंद्रे उभारली गेली आहेत. गुरुवारी (ता. १९) या केंद्रांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

औद्योगिकीकरणानंतर शहरीकरण झपाट्याने वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये प्रदुषण, वाहतूक कोंडी, जागांची कमतरता, अतिक्रमण अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्याच्या हेतूने आता राज्य सरकारने गावोगावी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

दहावी, बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुण-तरुणींना मल्टिस्किल टेक्किशियन, ग्राफिक डिझायनर, पर्यटन मार्गदर्शक, मोबाईल फोन हार्डवेअर रिपियर टेक्निशियन, जामजेली ॲण्ड कॅचअप प्रोसेसिंग टेक्निशियन, एलईडी लाईट रिपिअर टेक्निशियन, फिल्ड टेक्निशियन यासह अनेक कोर्स मोफत शिकविले जाणार आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्याठिकाणी तरुण-तरुणींना प्रशिक्षण मिळणार आहे. एका केंद्रावर ५० तरुणांच्या दोन बॅचेस असतील. तीन वर्षांपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे.

कार्यक्रमासाठी हवी एक ते दीड हजारांची गर्दी

गुरुवारी (ता. १९) राज्यातील ५११ गावांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ होणार आहे. दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या केंद्रांचे उद्‌घाटन करतील. या कार्यक्रमासाठी प्रत्येक केंद्रावर पहिल्या दिवशी एक ते दीड हजार लोक उपस्थित राहावेत, याची दक्षता घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या योजनेला पहिल्यांदा प्रधानमंत्री उद्योजकता व कौशल्य विकास केंद्र असे नाव देण्यात आले होते. पण, पुन्हा त्यात बदल करून प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र असे नाव दिल्याचेही सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी केंद्रे

नागणसूर, जेऊर (अक्कलकोट), संत दामाजी नगर, भोसे (मंगळवेढा), माळीनगर, यशवंत नगर, खंडाळी (माळशिरस), करकंब, कासेगाव, टाकळी (पंढरपूर), महुद, कोळे (सांगोला), टेंभुर्णी, मोडनिंब (माढा), पांगरी, मळेगाव (बार्शी), कुंभारी, मंद्रुप (दक्षिण सोलापूर), नान्नज, बीबी दारफळ (उत्तर सोलापूर), जेऊर, वांगी (करमाळा) व कुरुल, पेनूर (मोहोळ).

ग्रामीण भागातील तरुणांना मोठा फायदा

ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार तथा उद्योगाचे प्रशिक्षण गावातच मिळावे म्हणून जिल्ह्यातील २४ गावांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरु होणार आहेत. गुरुवारी त्याचा शुभारंभ होईल.

- हणमंतराव नलावडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com