युती न झाल्यास आम्ही भाजपसोबत - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत असेल. युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई; अन्यथा विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आपली पसंती राहील. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

आठवले यांनी शनिवारी ‘सकाळ’ कार्यालयातून फेसबुक लाइव्हवर जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबत निवडणूक लढविल्यास जास्त जागा मिळतील. उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याची विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. मोदी यांनी अनुकूलता दर्शविली असून, लवकरच ठाकरे यांची नाराजी दूर होईल.’’ देशात दलितांवरील अत्याचारांत वाढ होत असल्याबाबत विचारले असता, त्यांनी अत्याचार होत असल्याची कबुली दिली.

त्यासाठी केंद्र सरकार खंबीर पावले उचलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, यापूर्वी पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, ‘‘सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. मित्रपक्षांकडून रिपब्लिकन पक्षाला सत्तेत पुरेसा सहभाग मिळत नाही. कार्यकर्त्यांना महामंडळांवर संधी दिली जात नाही.’’ 

मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडून शिकवणी घ्यावी, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच ट्‌विट केले होते. पवार यांनीही शिकवणीस तयार असल्याचे सांगितले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शिकवणी लावल्यास जलसिंचनाचा विषय निघेल, अशी मिश्‍किल टिप्पणी त्यांनी केली.  

प्रकाश आंबेडकरांचा आदर 
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्‍याबाबत ‘कोण आठवले?’, असे विधान केले होते. या संदर्भात आठवले म्हणाले, ‘‘त्यांचा आदर करतो. ते मला ओळखत नसले तरी महाराष्ट्र आणि देश मला ओळखतो.’’ 

रिपब्लिकन पक्षाचे आज अधिवेशन 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रविवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजता आरटीओ कार्यालयाजवळ एसएसपीएमएस मैदानावर राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Web Title: yuti BJP Ramdas athawale Politics