युतीचं बिनसलंय; भाजप- शिवसेना काडीमोडाच्या उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

आता पुढे काय?
मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देऊ शकतात. हे निमंत्रण स्वीकारले, तर त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा वेळ मिळेल. शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्रे राज्यपालांना दिल्यास राज्यपाल शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बोलावू शकतात. सत्तास्थापनेदरम्यान घोडेबाजार होत असल्याची राज्यपालांची भावना झाली, तर ते राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्र सरकारला करू शकतात; पण अशा स्थितीत बहुमताचा आकडा पार करणारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची आघाडी न्यायालयात धाव घेऊन सत्तास्थापनेची संधी मिळावी, अशी याचिका दाखल करू शकतात.

मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना-भाजप युतीमधील ‘मन’भेद आज चव्हाट्यावर आले, सुरुवातीला ‘आमचं ठरलंय’ असा एकीचा सूर आळविणाऱ्या या दोन्ही मित्र पक्षांमध्ये चांगलेच बिनसलेले दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेतृत्वावर निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. दरम्यान, राज्यपालांनी अद्याप कोणालाही सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले नसल्याने प्रभारी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच सरकार चालवतील.

‘मुख्यमंत्रिपदाची चर्चा नाही’ - देवेंद्र फडणवीस
भाजप- शिवसेना युती होण्यापूर्वी उभय पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला माझ्यासमोर कधीच ठरला नव्हता. तसेच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्दच दिला नव्हता, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. गेले १४ दिवस मौन बाळगलेल्या फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच खुलासा केला. 

राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते बोलत होते. माझ्यासमोर युतीची चर्चा झाली तेव्हा शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा विषय झाला नव्हता. याउलट शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची बोलणी फिस्कटली होती. त्यानंतर चर्चा थांबली होती. नंतर सुरू झाली तेव्हा माझ्यासमोर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबतचे ठरले नव्हते. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात याबाबत चर्चा झाली असावी म्हणून मी शहांना याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनीही उद्धव ठाकरेंना असा कोणताच शब्द दिला नव्हता असे स्पष्ट केले असल्याचे या वेळी फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभेची मतमोजणी झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या वक्‍तव्याने मला धक्‍का बसला, असे सांगून फडणवीस म्हणाले, की मतमोजणी झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव म्हणाले, की शिवसेनेला सर्व पर्याय खुले आहेत. आपली म्हणजे भाजप आणि शिवसेनेची युती असताना आणि महायुतीला स्पष्ट बहुमत असताना उद्धव यांनी अशी भूमिका घेणे अत्यंत गंभीर होते.

खरेतर युतीतील गैरसमज आपसातील चर्चेने संपवणे शक्‍य होते. मात्र, शिवसेनेने त्यादृष्टीने तशी भूमिका घेतली नाही, असा आरोपही त्यांनी केला. गेली पाच वर्षे महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यामुळे पारदर्शी कारभार करता आला. गेली पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो, त्यातील चार वर्षे दुष्काळाची होती. हे वर्ष अतिवृष्टीचे आहे. मात्र या संकटात आम्ही शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिलो, असेही फडणवीस म्हणाले.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात पारदर्शी सरकार देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, त्यासाठी शिवसेनेशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला; पण शिवसेनेनेच आमच्याशी चर्चा करणे थांबवले, असे सांगताना मी स्वत: राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि एका पक्षाचा नेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकवेळा फोन केले; पण त्यांनी माझा एकही फोन घेतला नाही, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी आज केला. 

शिवसेनेने आमच्याशी चर्चा केली नाही. आमच्याबरोबरची चर्चा थांबवली याचे दु:ख नाही, त्यांनी आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली. दोन्ही काँग्रेससोबत चर्चा करायला त्यांच्याकडे वेळ होता. ज्यांच्याविरोधात जनतेकडे मते मागितली, त्यांच्याशी चर्चा होत होती; पण आमच्याशी चर्चा होत नव्हती. एकदा नव्हे, दिवसातून तीन-तीनवेळा चर्चा केली. याचे दु:ख होते, असे ते म्हणाले. 

... पण सरकार स्थापन होत नाही!
आम्ही गेली पाच वर्षे शिवसेनेसोबत काम केले, त्यामुळे आता आणि भविष्यातही त्यांच्यावर टीका करणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या काही लोकांनी सातत्याने विरोधी वक्तव्ये केली. अशा वक्तव्याने मीडिया स्पेस मिळते; पण त्याने सरकार स्थापन होत नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांना हाणतानाच उद्धव यांच्या आजूबाजूच्या लोकांनी दरी वाढवण्याचे काम केल्याचेही त्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याबाबत ठरले नव्हते
शहा यांनीही अडीच वर्षांचा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला नव्हता
शिवसेनेनेच आमच्याशी चर्चा करणे थांबविले
अनेकवेळा संपर्क साधूनही उद्धव यांनी फोन घेतला नाही
उद्धव यांच्या आजूबाजूला असणारेच बोलत आहेत

‘शिवसेनेला संपवण्याचा डाव’ - उद्धव ठाकरे​
गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत असल्याचा दुसरा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. त्यात त्यांनी फडणवीस यांना अनेकदा टोले लगावले. ठाकरे म्हणाले, ‘‘फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत अचाट कामे केली असल्याने मी त्यांना धन्यवाद देतो. आम्ही त्यांच्यासोबत पाच वर्षे राहिलो नसतो, तर त्यांना करता आली नसती. म्हणजेच आम्ही विकासाच्या आड आलो नाही. आम्ही शब्द पाळतो. बाळासाहेबांकडून मी तेच शिकलो आहे. पहिल्या प्रथम कोणीतरी ठाकरे घराण्यावर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा दाखला देऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला, पण जनतेला सर्व माहीत आहे, की कोण खोटे बोलतेय आणि आमचे काय ठरले होते याला सर्व साक्षी आहेत.

लोकसभेच्यावेळी युतीसाठी मी दिल्लीत गेलो नव्हतो, ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी त्यास नकार दिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते. याची आठवण शहा यांना करून दिली असता त्यांनी ते मान्य केले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून ही चर्चा झाली होती. नंतर अमित शहांनी फडणवीसांना याबाबत माहिती दिली. भाजपत नाराजी पसरू नये यासाठी आत्ता ही माहिती जाहीर करू नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असे फडणवीस म्हणाले. आता ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला. हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते.’’ 

ठाकरे पुढे म्हणाले, की मी खोटारडा म्हणून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही. खोटे बोलण्याचा हिशेब काढला, तर अच्छे दिन, नोटाबंदीपासून कोण खोटे बोलले हे दिसेल. विधानसभेसाठी मी १२४ जागा स्वीकारल्या. भाजपने जिंकणाऱ्या जागा स्वतःकडे ठेवून हरणाऱ्या जागा मला दिल्या. लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली त्याचा आनंद होता. मात्र जे झाले गेले ते आता न साफ केलेल्या गंगेला मिळाले. गंगा साफ करताना यांची मने कलुषित झाली. यांच्या मनात सत्तेची लालसा इतक्‍या स्तरावर जाईल याची कल्पना नव्हती. 

खोटेपणाशी नाते नको...
बहुमत नसताना काळजीवाहू मुख्यमंत्री आमचेच सरकार येणार म्हणत आहेत. त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावे. त्यांनी आमच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी तीन तीन वेळा बोलण्याचा आरोप केला. तुम्ही आमच्यावर काय पाळत ठेवत होतात का, असा सवाल ठाकरे यांनी केला. मी अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केलेली नाही. खोटेपणासोबत मला कोणतेही नाते ठेवायचे नाही, असे सांगून यापुढे भाजपसोबत चर्चा होणार नसल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.

उद्धव म्हणाले
शहा आणि फडणवीस दोघेही खोटे बोलत आहेत
ठाकरे घराण्यावर कुणीतरी प्रथमच खोटारडेपणाचा आरोप केला आहे
मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव अमित शहांनीच मान्य केला होता
लोकसभेच्यावेळी भाजप नेतेच युतीसाठी माझ्याकडे आले होते
फडणवीस चांगले मित्र होते त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते

राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप युतीला कौल दिला असून, त्या दोन्ही मित्रपक्षांनी समंजसपणा दाखवीत सरकार स्थापन करावे, आम्ही तो पेच सोडवू शकत नाही. सर्वांत मोठ्या पक्षाला राज्यपाल सरकार स्थापनेचे निमंत्रण का देत नाहीत? युतीने त्यांच्यातील मतभेद आपापसांत साेडवावेत.
- शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी

सत्तेच्या समान वाटपाबाबत भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठलाही करार झालेला नाही. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील युतीमधील ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या अधिक असेल, तो पक्ष मुख्यमंत्रिपदी दावा करण्यास पात्र असेल, याच व्यवस्थेवर भर दिला होता.
- नितीन गडकरी, नेते भाजप

भाजपकडून विरोधी पक्षांच्या आमदारांना विविध प्रलोभने दाखविण्याचे प्रकार सुरू असून, आमच्या आमदारांना 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. 
- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते 

भाजपने कुणाशीही संपर्क केलेला नसून, कॉंग्रेस नेत्यांनी येत्या 48 तासांमध्ये आमदारांच्या खरेदी-विक्रीचे पुरावे द्यावेत. अन्यथा, खोटी माहिती पसरविल्याबद्दल जनतेची माफी मागावी. 
- सुधीर मुनगंटीवार, नेते भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yuti bjp shivsena disturbance government