युतीबाबत संभ्रमच

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

भाजप नेत्यांनी शिवसेनेसोबत युती व्हावी, अशी सततची भावना व्यक्‍त केलेली असली, तरी प्रत्यक्षात युतीच्या जागावाटपाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दिलेला नाही. याबाबत अधिकृत चर्चा अथवा प्रस्ताव नसल्याने शिवसेनाही स्बबळाच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती आहे.  

मुंबई - शिवसेना-भाजप युतीबाबत अनेक चर्चा सुरू असताना, ‘युतीच्या जागावाटपाबाबत अद्याप चर्चाच सुरू नाही. युतीच्या चर्चेसाठी कोणत्याही नेत्यावर अद्याप जबाबदारी सोपवलेली नाही,’ असे स्पष्ट वक्‍तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केल्याने युतीचा संभ्रम कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा तसेच नितीन गडकरी व केंद्रीय गृह मंत्री राजनाथसिंह ‘मातोश्री’वर जाण्याची शक्‍यता असल्याची आज राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, मुनगंटीवार यांनी या चर्चेला दुजोरा दिला नाही. अशाप्रकारे कोणत्याही नेत्यांची युतीबाबत चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १९९५ चा फॉर्म्युला शिवसेनेकडून दिलेला असेल तर त्यावर चर्चाच शक्‍य नसल्याचे ते म्हणाले. २००९ ला ज्या प्रकारे युतीचे जागावाटप होते त्यावर चर्चा होऊ शकते. युतीच्या चर्चेसाठी २००९ चाच आधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

भाजप नेत्यांनी शिवसेनेसोबत युती व्हावी, अशी सततची भावना व्यक्‍त केलेली असली, तरी प्रत्यक्षात युतीच्या जागावाटपाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दिलेला नाही. याबाबत अधिकृत चर्चा अथवा प्रस्ताव नसल्याने शिवसेनाही स्बबळाच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती आहे.  

लोकसभेसाठी भाजप २५ तर शिवसेना २३ जागांवर लढणार असल्याच्या बातम्या माध्यमांत आल्या असल्या, तरी त्याला दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दुजोरा दिलेला नाही. लोकसभेसोबतच विधानसभेच्या जागावाटपाचे सूत्र निश्‍चित करावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र, त्यावरही भाजपने कोणताही प्रतिसाद दिलेला नसल्याने युतीचे घोडे नेमके कुणामुळे अडलेय, याबाबत दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

Web Title: Yuti Shivsena BJP Sudhir Mungantiwar Politics