स्वबळावर लढू आणि जिंकूही : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

शिवसेनेची स्वबळावर लढण्याची सुरवात झाली आहे. पालघरपासून शिवसेना स्वबळावर लढायला तयार झाली असून, पालघरमध्ये बाकीचे दिशाभूल करून जिंकले आहेत. एकहाती सत्तेची सुरवात आतापासूनच करायची आहे. राष्ट्रसेवा, राष्ट्रहित हेच आमचे लक्ष्य आहे.

मुंबई : शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. आता आपल्याला स्वबळावर लढायचं आहे आणि स्वबळावर जिंकायचं आहे. आता जिंकल्याशिवाय शांत बसू नका. आपल्याला राज्यात सत्ता आणायचीच आहे, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज (मंगळवारी) मुंबईत होत आहे. शिवसेना आणि भाजप युतीतील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचेही भाषण होणार आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, ''शिवसेनेची स्वबळावर लढण्याची सुरवात झाली आहे. पालघरपासून शिवसेना स्वबळावर लढायला तयार झाली असून, पालघरमध्ये बाकीचे दिशाभूल करून जिंकले आहेत. एकहाती सत्तेची सुरवात आतापासूनच करायची आहे. राष्ट्रसेवा, राष्ट्रहित हेच आमचे लक्ष्य आहे. आम्ही कोणाच्या जीवावर मोठे झालेलो नाही. साम, दाम, दंड, भेद वापरणारे तिकडे आहेत. आपण नुसती मतं नाही तर मनही जिंकायची. आजपर्यंत आम्ही स्वतःची ताकद पाहिली नाही. पण, आता स्वबळावरच लढायचे आणि जिंकायचे.''

शिवसेना एकहाती सत्तेत का नाही: मनोहर जोशी
मुंबईसारख काम सगळ्या महाराष्ट्रात करा. महाराष्ट्राच्या प्रत्येक  भागात पोहचण गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात अद्याप शिवसेना पोहचली नाही. शिवसेना देशभर पोहचवायची आहे. महाराष्ट्रात शिवसेना एकहाती सत्तेत का आली नाही, असे म्हणत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी सेनेले आरसा दाखविण्याचे काम केले.

Web Title: YuvaSena leader Aditya Thackeray criticize BJP