झाकीर नाईकची आयआरएफ धर्मांतरासाठी शिखर संस्था?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

मुंबई - इस्लाम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक याचे इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) राज्यातील धर्मांतर घडवणाऱ्या संघटनांची शिखर संघटना झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया‘च्या (इसिस) दहशतवाद्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी आधीच अडचणीत सापडलेला डॉ. नाईक "आयआरएफ‘ सदस्यांच्या मदतीने धर्मांतर घडवण्यास प्रोत्साहन देत असल्याचेही तपासात पुढे आले आहे. 

मुंबई - इस्लाम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक याचे इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) राज्यातील धर्मांतर घडवणाऱ्या संघटनांची शिखर संघटना झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया‘च्या (इसिस) दहशतवाद्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी आधीच अडचणीत सापडलेला डॉ. नाईक "आयआरएफ‘ सदस्यांच्या मदतीने धर्मांतर घडवण्यास प्रोत्साहन देत असल्याचेही तपासात पुढे आले आहे. 

इस्लामचा प्रसार आणि प्रचाराचे काम करणाऱ्या डॉ. झाकीर नाईक आणि त्याच्या आयआरएफच्या कारवायांबाबत तपास यंत्रणांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. या संस्थेला जगभरातून होणाऱ्या अर्थपुरवठ्यावर तपास यंत्रणांची नजर आहे. राज्यातील आठ ते 10 संस्था वेगवेगळ्या नावांनी बिगरमुस्लिमांचे धर्मांतर करतात. या सगळ्या संस्थांचे "आयआरएफ‘सोबत संबंध असल्याचेही उघडकीला आले आहे. "आयआरएफ‘ या सर्व संघटनांच्या शिखर संघटनेप्रमाणे काम करत असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अन्य धर्मीयांना मुस्लिम करण्यासाठी लागणारा खर्च "आयआरएफ‘कडून भागवला जात होता, हेही तपासात उघड झाले आहे. धर्मांतरानंतर चांगले आयुष्य देण्यासोबतच सुंदर तरुणींशी विवाह, नोकरी, पैसे अशा प्रलोभनांद्वारे अनेक तरुणांचे धर्मांतर करण्यात आले. अशा प्रकारे मुंबईतील काही प्रतिष्ठित कुटुंबांचे धर्मांतर झाल्याचे समजते. "आयआरएफ‘चा सदस्य असलेला अर्शिद कुरेशी सर्वसामान्य तरुणांना इस्लाममध्ये धर्मांतरासाठी तयार करायचा. धर्मांतरासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता रिझवान खान करायचा, त्यासाठी त्याला 10 ते 20 हजार रुपये मिळत होते, असे वरिष्ठ अधिकारी सांगतात. या दोघांनी केरळमधील काही युवकांचे जबरीने धर्मांतर केले. त्यानंतर केरळ पोलिस आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्यांना अटक केली. 

या दोघांनी देशभरात दोन हजारपेक्षा जास्त जणांचे धर्मांतर केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या दोघांनी धर्मांतरित केलेले केरळमधील तरुण इसिसमध्ये दाखल होण्यासाठी सीरियाला गेल्याचेही उघड झाले आहे. 

कारवाईची संधी गमावली? 

औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी आणि 26/11 हल्ल्यातील दहशतवाद्यांचा "हॅण्डलर‘ झबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याचे डॉ. झाकीर नाईकच्या ग्रंथालयात काम करणाऱ्या फिरोज देशमुख याच्यासोबत संबंध होते. घातपाती कारवायांत हात असलेल्या आणखी काही जणांचा त्या ठिकाणी राबता होता, त्या वेळीच त्याच्यावर कारवाई करणे तपास यंत्रणांना शक्‍य होते. तथापि, देशमुखविरुद्ध पुरावे मिळवण्यात तपास यंत्रणांना अपयश आले, परिणामी देशमुखला न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी मुक्त केले. त्या वेळी तपास यंत्रणांनी प्रयत्न केले असते, तर डॉ. नाईकविरुद्ध कारवाई करता आली असती. ही संधी गमावली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: Zakir Naik ayaaraepha to convert Summit organization?