आता एकच लक्ष्य... सोलापूर विमानतळावरुन उड्डाण! ‘सेलिब्रिटी‘ चिमणीनंतर त्या १०५ अडथळे हटविण्याची गरज

सोलापूरच्या विमानतळावरुन विमान उडण्यास अडचण ठरणारी सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पडली खरी; परंतु, विमानतळावरुन उडान योजनेचा लाभ मिळवण्याच्या दृष्टिने तातडीने सेवा सुरु होणे व ती अव्याहत राहण्याची जबाबदारी व्यापारी, उद्योजक, नोकरदारांवर राहणार आहे.
Aurangabad Air India Flight service
Aurangabad Air India Flight servicesakal

सोलापूर : सोलापूरच्या होटगी रस्त्यावरील विमानतळावरुन विमान उडण्यास अडचण ठरणारी सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पडली खरी; परंतु, या विमानतळावरुन आता उडान योजनेचा लाभ मिळवण्याच्या दृष्टिने तातडीने विमानसेवा सुरु होणे व ती अव्याहत राहण्याची जबाबदारी व्यापारी, उद्योजक, नोकरदारांवर राहणार आहे. यापुढे सोलापूरच्या विकासावरच चर्चा होण्याची अपेक्षा आहे. चिमणीच्या पाडकामानंतर अनेक प्रश्‍नांची उकल होण्यासाठी यावर काळच उपाय राहणार हे निश्‍चित!

सोशल मीडियावर मिम्सचा पडणारा पाऊस व राजकीय धुळवड पाहता हे प्रकरण आठ वर्षे ताणले गेले. वृत्तपत्रांचे रकाने भरण्यामध्ये गेल्या आठ वर्षात ‘सिद्धेश्‍वर'च्या ‘सेलिब्रिटी‘ ठरलेल्या चिमणीने मोठा वाटा उचलला होता. तब्बल आठ वर्षे चाललेला हा संघर्ष आता संपुष्टात आलेला असला तरी यामागील व भविष्यातील राजकारणाने चिमणीच्या आयुष्याची दोरी आणखी बळकटच राहण्याची चिन्हे आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आगामी सर्वच निवडणुका या चिमणीच्या विषयाभोवती फेर धरण्याची शक्यता आहे. काही समीकरणे जातीची राहतील, तर विकासाची दिशा दर्शविणारी समीकरणे मात्र अत्यल्पच राहणार हे निश्‍चित!

विमानाच्या फनेल झोनमध्ये सिद्धेश्‍वर कारखान्याच्या ९२ मीटर उंचीमुळे विमान उड्डाणात अडचण येत होती. बेकायदेशीर चिमणीविरोधात हजारोंच्या संख्येने सोलापूरकर एकवटले. तर चिमणी बचावासाठी कारखान्याचे सभासद व बोरामणी विमानतळ उभारणीसाठी संघर्ष करणाऱ्यांनी पाठराखण केली. परंतु, महापालिकेने आठ वर्षे चाललेल्या न्यायालयीन व प्रशासकीय वादावर ३५ तास ५२ मिनिटांची अथक मोहीम राबवीत अगदी सात सेकंदात चिमणी जमीनदोस्त करून कायमचा तोडगा काढला. मागील अनुभव लक्षात घेता पोलिस आणि प्रशासनाने यावेळी बाळगलेली सावधानता, वेळीच घेतलेले निर्णय, पाडकामासाठी लागणाऱ्या यंत्रणेबाबतची तत्परता या बाबी नजरेआड करुन चालणार नाहीत.

चिमणी पाडण्याने साखर कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम होईल का? तो झाला नाही तर २८ हजार सभासदांच्या उसाचे काय? सहवीज निर्मितीची चिमणीच नसल्याने त्याचा उताऱ्यावर, गळितावर व ऊसदरावर काय परिणाम होणार? प्रमुख अडथळा असलेली चिमणी तर पडली अन्य १०५ अडथळ्यांना हटविण्यासाठी प्रशासनाची मोहीम असेल का? असेल तर ती किती दिवसात पूर्ण होईल? विद्युत मंडळाच्या उच्चदाबाच्या तारा, प्रार्थनास्थळाचा अडथळा कसा हटविला जाईल? या प्रश्‍नांची सरबत्ती चालूच राहणार.

दोन सख्ख्या मित्रांमध्ये साखर कारखान्याचे प्रशासन, फायदा-तोटा, ताळेबंद, कामगारांचे पगार यातून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद चिमणी पाडकामापर्यंत आले. एनजीटीचा दंड व चिमणी पाडकामाच्या खर्चापर्यंत या वादाने मजल मारली. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी किमान अर्धा कोटींचा खर्च झाल्याची माहिती आहे, खरे खोटे तेच जाणोत. या साऱ्या बाबींतून साध्य काय? हा प्रश्‍न आगामी काळात उचल खाईल.

आरोग्यसेवा, उद्योग, व्यापारी, नोकरदार यांच्याबरोबरच आयटी कंपन्यांची उभारणी, त्यांना देण्यासाठीच्या सुविधांमध्ये अत्यंत गरजेची विमानसेवा सोलापुरातून असण्याची खरी गरज होती. चिमणीच्या अडथळ्यामुळे ती बंद केल्याचे डीजीसीएच्या अहवालात नमूद केल्याने चिमणी हटाव मोहीम राबविली गेली. एकाही लोकप्रतिनिधीने चिमणीच्या समर्थनार्थ अथवा थेटपणे विरोधी भूमिका न घेतल्याने सोलापूरकर संभ्रमातच होते. चिमणीविरोधक व समर्थक मात्र या लोकप्रतिनिधींना त्यांच्या सोयीने जबाबदार धरत होते.

सोयीची विमानसेवा

सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-बंगळूर, सोलापूर-तिरुपती या मार्गावर विमानसेवा देण्यासाठी दोन कंपन्यांनी सकारात्मकता दाखविल्याची माहिती मंचच्या सदस्याने दिली. सध्या कलबुर्गीहून तिरुपतीची सेवा घेणाऱ्यांमध्ये ६० टक्के सोलापूरकर असल्याचीही माहिती सर्व्हेमधून मिळाल्याचा त्यांनी केलेला दावा तपासावा लागेल. तो जर खरा निघाला तर सोलापूरची सेवा यशस्वीतेचे शिखरच गाठेल. मुंबईची सेवा अत्यावश्‍यक असून तेथे विमानाची वेळ (टायमिंग) सोयीची असेल तरच ही सेवा उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

(गाळपावर परिणामच!)सहवीज निर्मितीची चिमणी पडल्यानंतर कारखाना बंद पडणार नसल्याचे काही लोकांचे म्हणणे होते. परंतु, सिद्धेश्‍वर कारखान्याच्या या एकमेव चिमणीद्वारे वीज निर्मिती आणि गाळप दोन्ही होत होते. त्यामुळे गाळपाचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच जुन्या चिमण्याही विमानतळाच्या अडथळ्यात येत असल्याने त्यांचाही काही उपयोग होईल, असे दिसत नाही. नव्या चिमणीच्या उभारणीसाठी व अद्ययावत यंत्रणेसाठी लागणाऱ्या कालावधीची तपासणी करावी लागेल. कारखान्याचे विस्तारीकरण झाल्याने नव्या चिमणीच्या उंचीचा पुन्हा प्रश्‍न ‘आ‘ वासून उभा राहणार हे निश्‍चित!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com