‘पानिपत’च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

  • विश्‍वास पाटील यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल
  • पानिपत या चित्रपटात आपल्या या साहित्यातील प्रसंग, तपशील आदींचे चौर्यकर्म करण्यात आल्याचा पाटलांचा आऱोप
  • चित्रपटाचे निर्माते रोहित शेलटकर व सुनीता गोवारीकर तसेच रिलायन्स एंटरटेनमेंट यांच्याविरोधात हा सूट दाखल करण्यात आला आहे

 

मुंबई : आगामी पानिपत या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपल्या साहित्याचे व संशोधनाचे चौर्यकर्म करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी व आपल्याला नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी विख्यात साहित्यिक व पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी उच्च न्यायालयात सूट दाखल केला आहे.

विश्‍वास पाटील यांनी आठ वर्षे संशोधन करून लिहिलेल्या पानिपत या कादंबरीवर आधारित रणांगण हे नाटकही रंगभूमीवर आले होते. त्या दोघांनाही मराठी रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. लवकरच प्रसिद्ध होत असलेल्या पानिपत या चित्रपटात आपल्या या साहित्यातील प्रसंग, तपशील आदींचे चौर्यकर्म करण्यात आले. माझ्या साहित्यातील हा तपशील चित्रपटात वापरण्यापूर्वी माझी परवानगीही घेण्यात आली नव्हती, असा पाटील यांचा दावा आहे. आशुतोष गोवारीकर प्रॉडक्‍शन, चित्रपटाचे निर्माते रोहित शेलटकर व सुनीता गोवारीकर तसेच रिलायन्स एंटरटेनमेंट यांच्याविरोधात हा सूट दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी सोमवारी न्या. एस. सी. गुप्ते यांच्यासमोर होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याशी संपर्क साधला असता. तो होऊ शकला नाही.

रोहित शेलटकर यांचे प्रतिनिधी विख्यात साहित्यिक संजय पाटील यांना कान्स चित्रपट महोत्सवात भेटले. त्या वेळी एका ऐतिहासिक चित्रपटासाठी कथा हवी असल्याने पाटील यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्या वेळी पाटील यांनी पानिपत व रणांगण यांच्याबाबत शेलटकर यांना सांगितले.

शेलटकरांनी यावर चित्रपटाची कथा लिहिण्यास सांगितल्यावर संजय पाटील यांनी विश्‍वास पाटील यांची परवानगी घेऊन कथा लिहिली, त्याचे शेलटकर यांच्यासमोर मुंबईत वाचनही झाले. मात्र नंतर शेलटकर यांनी संजय पाटील यांची हकालपट्टी केली. त्यामुळे हा चित्रपट थांबला असे विश्‍वास पाटील यांना वाटले. या चित्रपटासाठी आपले साहित्य वापरण्यापूर्वी निर्मात्यांनी आपली परवागनी घेतली नसल्याचा दावा करून त्यांनी हा सूट दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DEMAND FOR STAY ON PANIPAT MOVIE